घरफाळ्यांतून दरोडा घालणाऱ्यांचा बंदोबस्त करा : कृती समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2020 11:40 AM2020-11-07T11:40:11+5:302020-11-07T11:44:21+5:30
muncipalty, kolhapurnews घरफाळा विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शहर, जिल्हा कृती समितीने केली होती. चार महिने झाले तरी महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले. यामुळे कृती समितीच्यावतीने शुक्रवारी महापालिकेसमोर अभिनव पद्धतीने निदर्शने केली. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, लेझीम, हलगीच्या कडकडाटाने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. घरफाळ्यातून भ्रष्टाचार करून महापालिकेवर दरोडा घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली.
कोल्हापूर : घरफाळा विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शहर, जिल्हा कृती समितीने केली होती. चार महिने झाले तरी महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले. यामुळे कृती समितीच्यावतीने शुक्रवारी महापालिकेसमोर अभिनव पद्धतीने निदर्शने केली. यावेळी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, लेझीम, हलगीच्या कडकडाटाने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. घरफाळ्यातून भ्रष्टाचार करून महापालिकेवर दरोडा घालणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीही करण्यात आली.
कृती समितीचे रमेश मोरे म्हणाले, २३ जून २०२० ते आजअखेर निवृत्त न्यायाधीशांमार्फत घरफाळा विभागाची चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली होती. यावर सात दिवसांची अंतिम मुदत देऊनही काहीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे पहिला टप्पा म्हणून प्रशासनाला जाग आणण्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने केली. पुढील टप्प्यात आंदोलन आक्रमक करणार असून प्रशासन जबाबदार राहील.
घरफळा चौकशीप्रमुख उपायुक्त निखील मोरे म्हणाले, कोरोनामुळे कृती समितीच्या मागणीची पूर्तता करता आली नाही. संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया सुरू असून नोटीस बजावली आहे. समितीसोबत लवकरच बैठक घेऊन सर्व माहिती देऊ. यावेळी कृती समिती अशोक पोवार, भाऊ घोडके, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, सुनीता पाटील, सुवर्णा मिठारे, विद्या पवार, पूजा पाटील, अनिता जाधव, सुजाता खराडे, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.
लक्षवेधी फलक
महापालिकेवर दरोडा घालणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, महापालिकेला लागलेल्या घुशीवर औषध फवारणी करा, महापालिका लुटणाऱ्या नराधमांचा धिक्कार असो, लक्षवेधी फलकासह प्रशासनाला जाग आणण्यासाठी महापालिकेसमोर निदर्शने केली.