पोहताना घ्या काळजी --
By Admin | Published: April 14, 2017 11:40 PM2017-04-14T23:40:14+5:302017-04-14T23:40:14+5:30
आयुर्वेदिक
आता शाळांना सुट्या लागल्या. बाहेर ऊन मी म्हणतंय. त्यात फक्त सुटीतच वेळ मिळत असल्याने सर्व पालकांना आपल्या मुलांना पोहायला शिकविण्याचा एकदम उत्साह येतो. मग मिळेल तिथं मिळेल तसं पोहायचे प्रयत्न होतात.
सर्वसाधारणपणे सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीत आपण फार फिकीर करीत नाही. वास्तविक टँकला पोहायला जाणाऱ्या सर्व व्यक्तींची त्वचारोगांसंबंधी कसून तपासणी व्हायला हवी. अनेक त्वचारोग हे संसर्गजन्य असल्याने या बाबतीत धोका जास्त संभवतो. दुसरा भाग म्हणजे पोहायला उतरण्यापूर्वी प्रत्येकाने स्नान (शॉवर) केले पाहिजे व नंतर पोहून झाल्यावरही स्नान केले पाहिजे; पण अनेकवेळा तशी काळजी घेतलेली दिसून येत नाही. पोहताना एकावेळी टँकमध्ये किती व्यक्ती असाव्यात यावर निर्बंध हवेत. त्यामुळे पोहताना एका व्यक्तीकडून दुसऱ्याला इजा होणार नाही.
पोहण्याच्या बाबतीत सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जी लहान मुलं पोहायला शिकत असतात, ती सुरुवातीला नाका-तोंडात गेलेलं पाणी तसंच गिळतात. पाण्याची शुद्धता आपणा सर्वांनाच माहीत असते. असं पाणी पोटात गेल्यावर मुलांना उलट्या, जुलाब किंवा ताप येऊ शकतो. यासाठी मुलांना योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत. शिवाय पोहायला शिकवणाऱ्या व्यक्तींनी काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये असे असंख्य रुग्ण बघायला मिळतात.
सार्वजनिक आरोग्यासाठी आणखी एक सर्वांत धोकादायक गोष्ट म्हणजे रस्त्यावर कुठेही थुंकणे! आपल्याला या गोष्टीचं गांभीर्य कधी कळणार कोणास ठाऊक, रोग झाल्यावर त्यावर लक्षावधी रुपये खर्च करण्यापेक्षा या रोग पसरवणाऱ्या मूलभूत गोष्टींकडे जरा जास्त लक्ष दिलं तर देशाचे करोडो रुपये वाचतील. अनेक देशांतून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर कडक निर्बंध आहेतच शिवाय कडक शिक्षांची तरतूद आहे. नाकातून सर्दीच्या वेळी किंवा एका शिंकेतून लक्षावधी जंतू बाहेर पडतात. तीच गोष्ट तोंडावर हात न घेता खोकण्याची व कुठेही थुंकण्याची. साध्या खोकण्याच्या जंतूपासून ते क्षयसारख्या घोर व्याधीपर्यंतचे अनेक जंतू आपल्या तोंडातून बाहेर पडत असतात आणि आपण हे रोग फैलावण्यासाठी कळत-नळकत मदत करत असतो.
आरोग्याच्या दृष्टीने तंबाखू किंवा तत्सम वस्तू किती घातक आहेत हे सर्वांनाच माहीत आहे, पण एकदा ते खाल्ले की, आपण कोणत्या गाडीत बसलो आहोत याचेही भान न ठेवता काच खाली उतरवून पिंक बाहेर येते. मग तो मागच्याचे किती का नुकसान करेना! ‘स्वच्छ भारत की जय’!
आयुर्वेदाने जितका वैयक्तिक आरोग्यावर भर दिलाय तितकाच भर सार्वजनिक आरोग्यावरही दिलाय. नुसते परिसर स्वच्छतेचे धडे देऊन उपयोग नाही. प्रत्येकाने स्वत:ची नैतिक जबाबदारी म्हणून या गोष्टीकडे पाहिले तर भारत एक दिवस खरोखरच चांगला निरोगी देश म्हणूनही पुढे येईल !!
- डॉ. विवेक हळदवणेकर
(लेखक प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ आहेत)
‘ङ्म’’ङ्म‘ें३स्र१ं३्र२ं@िॅें्र’.ूङ्मे