वरकमाईसाठी वैद्यकीय बिलांची अडवणूक करणाऱ्यांचा बंदोबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:28 AM2021-01-16T04:28:53+5:302021-01-16T04:28:53+5:30
कोल्हापूर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचीच वैद्यकीय बिले मंजूर करताना वरकमाईसाठी काहींकडून अडवणूक केली जात आहे. दवाखान्यामुळे अगोदरच तणावात असणाऱ्यांना आणखी ...
कोल्हापूर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांचीच वैद्यकीय बिले मंजूर करताना वरकमाईसाठी काहींकडून अडवणूक केली जात आहे. दवाखान्यामुळे अगोदरच तणावात असणाऱ्यांना आणखी त्रास देण्याचे काम त्या विभागातील काही कर्मचारी करत असून, त्यांचा बंदोबस्त करा, अशी मागणी काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. कोरोनासंदर्भात शुक्रवारी प्रशासक आणि माजी पदाधिकारी यांची बैठक झाली यानंतर ते बोलत होते.
शारंगधर देशमुख म्हणाले, महापालिकेतील कर्मचारी दवाखान्यात उपचार घेऊन आल्यानंतर तणावामध्येच असतात. वैद्यकीय बिलासाठी संबंधित विभागात गेल्यानंतर त्यांना वरकमाईसाठी जाणीवपूर्वक अडवणूक करून उशिरा केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ऑडिटच्या नावाखाली दोन ते तीन महिने बिल दिले जात नाही. या संपूर्ण प्रकरणांची चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी.
यावेळी माजी पदाधिकाय्रांनी २०१९, २० मधील बजेटमधील मंजूर असणारी कामे अद्यपही सुरु झालेली नाहीत. टप्प्या टप्प्याने कामे न करता एकदमच करण्यात यावी, अशी मागणी केली. यावर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी प्राधान्य असणारी कामे तातडीने हाती घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी स्थायी समिती सभापती सचिन पाटील, गटनेते सत्यजित कदम उपस्थित होते.
चौकट
कोल्हापूर महापालिकेतील बहुतांशी ठिकाणी खिसा रिकामा झाल्याशिवाय कामे मार्गी लागत नाही. बाहेरील लोकांना हे अनुभव नवीन नाही. मात्र, यामधून महापालिकेतील कर्मचारीही सुटलेले नाहीत. आपल्याच सहकार्यांकडून वरकमाईसाठी वैद्यकिय बील तटवण्याचा प्रकार खेदजनक आहे. कडक शिस्तीच्या प्रशासक डॉ. बलकवडे यांच्यासमोर अशा लोकांना वेसन घालण्याचे आव्हान आहे.