वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसणार चाप, सीसीटीव्ही कॅमेरे ठेवणार नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 10:59 AM2018-08-07T10:59:45+5:302018-08-07T11:07:25+5:30
आयुक्त अभिजित चौधरी यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीतील सर्व विभागात ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना घरातून दुपारचे जेवण आणि तासाभराची झोप घेऊन येण्याची सवय झाली आहे; त्यामुळे दुपारी दीड वाजल्यापासून सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत अनेक विभाग कर्मचाऱ्यांविना रिकामे असतात. याची गंभीर दखल घेऊन आयुक्त अभिजित चौधरी यांनी मुख्य इमारतीतील सर्व विभागात मिळून ६९ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले; त्यामुळे अनेक फिरस्त्यांना आता यापुढे खुर्चीवर बसूनच काम करावे लागण्याची वेळ आली आहे.
महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सहा अशी आहे; पण अनेक कर्मचारी सकाळी अकरापर्यंत हलत डुलत यायचे. ही बाब लक्षात येताच तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांनी बायोमेट्रीक हजेरी पद्धत अंमलात आणली.
मुख्य कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ही बायोमेट्रीक हजेरी यंत्रे बसविली. नंतर त्यात फेस रिडिंगचाही समावेश करण्यात आला; त्यामुळे कर्मचाऱ्यांचे सकाळी वेळेवर कार्यालयात येणे बंधनकारक झाले.
तरीही त्यातून अनेक कर्मचाऱ्यांनी पर्याय शोधून बाहेर पडायचे मार्ग चोखाळले. बायोमेट्रीक हजेरी देऊन एकदा आत आल्यानंतर सरळ सायंकाळी सहा नंतरच तेथे जाऊन आऊट करीत होते. इतरवेळी मात्र आत - बाहेर करताना कर्मचारी त्याची नोंद करीत नव्हते.
सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत कार्यालयात बसून कामकाज करणे, नागरिकांच्या समस्या सोडविणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे. दुपारी दीड ते दोन ही वेळ जेवणाची असते. त्याही वेळेत कार्यालय सोडायचे नाही, अशी अट आहे. तरीही अनेक कर्मचारी व अधिकारी विविध कारणांनी केव्हाही कोठेही जात असतात, असे निदर्शनास आले.
अधिकारी गेले की त्यांच्या हाताखालील कर्मचारी, पदाधिकारी गेले की त्यांच्या कार्यालयातील कर्मचारीही घरी जातात. जेवण, दुपारची वामकुक्षी घेऊनच साडेचार वाजता परत कार्यालयात येतात; त्यामुळे नागरिकांच्या कामांचा खोळंबा होतो. नागरिकांना एकतर तिष्ठत राहावे लागते किंवा पुन्हा-पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात.
आयुक्त चौधरी यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सोमवारी ६९ कॅमरे बसविण्यात आले. आयुक्तांच्या कार्यालयात देखिल एक कॅमेरा बसविला आहे.
सर्व विभागावर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आयुक्त कार्यालयाचा नियंत्रण राहणार आहे. कारण स्वत: आयुक्त त्यांच्या कार्यालयात बसून कोण काय करतो, कोण कुठे गेला, हे पाहू शकणार आहेत. तसेच या कॅमेऱ्याच्या माध्यमातून रेकर्ॉडिंगही होणार आहे. सलग २५ दिवसांचे रेकर्ॉडिंग डाटा सेव केला जाईल; त्यामुळे दुपारी घरी जेवायला जाणे आणि वामकुक्षी घेऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे.