आला हिवाळा, त्वचा सांभाळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 07:23 PM2021-12-07T19:23:26+5:302021-12-07T19:24:07+5:30
सद्या वातावरणात मोठे बदल होत आहेत. दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आहे. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत आहेत.
संतोष मिठारी
कोल्हापूर : सध्या हिवाळ्यामध्ये काही दिवस पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, इतरवेळी दिवसा कडक ऊन आणि रात्री थंडी असे वातावरण आहे. त्यामुळे त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. त्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे, फुटणे आदींचा समावेश आहे. त्यामुळे पुरेसे पाणी, आहार, झोप घेणे आवश्यक आहे. मॉश्चरायझर, विंटरकेअर लोशन वापरणे महत्त्वाचे ठरणारे आहे.
त्वचा फुटतेय, कोरडी पडतेय?
- थंडीच्या दिवसात त्वचेमधील तैलग्रंथी निष्क्रिय होतात. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज पडते.
- त्वचा फुटणे, ओळ फुटणे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे अशा समस्या निर्माण होतात.
- त्वचा फुटणे अथवा कोरडी पडणे हे त्रासदायक ठरते. हे टाळण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
कोमट पाण्याने चेहरा वारंवार धुवावा
- अंघोळीसाठी एकदम कडक पाणी घेणे टाळावे. कोमट पाणी वापरावे.
- थंडी असताना जर बाहेर पडायचे असल्यास चांगले मॉश्चरायझर, विंटरकेअर लोशनचा वापर करावा.
- त्वचा स्निग्ध, कांतिमय ठेवण्याकरिता आहारामध्ये मोसंबी, पालेभाज्य, हिरव्या भाज्या, सलाडचे प्रमाण वाढवावे.
- रात्री झोपण्यापूर्वी दुधाची साय अथवा तुपामध्ये चंदन मिसळून मॉलिश केल्यास त्वचेचे तेज कायम राखता येते.
- अंघोळ झाल्यानंतर क्रीमऐवजी खोबरेल तेल, तिळाचे तेल, तूप, दुधाची साय यांचा वापर करावा.
त्वचारोग तज्ज्ञ म्हणतात
त्वचा कोरडी होणे टाळायचे असल्यास शक्यतो साबणाचा वापर टाळावा. खोबरेल तेलाने सर्व शरीराला मॉलिश करावे. त्यामुळे रक्तप्रवाह योग्य राहून त्वचेला तेज येते. एक चमचा मध, दोन चमचे दूधपावडर, दोन चमचे कोरफडीचा गर असा आयुर्वेदिक फेसपॅक वापरता येईल. कोमट पाण्याने चेहरा धुवावा. जेवणात बदाम अथवा बदामाचे दूध, पनीर, स्निग्ध पदार्थ असावेत. पुरेसे पाणी प्यावे. -डॉ. श्रीकांत नागावकर
योग्य आहार, पुरेशी झोप घ्यावी. थंडीत बरे वाटते म्हणून आपण कडक पाणी अंघोळीसाठी घेतो. मात्र, त्याचा त्वचेला फटका बसतो. त्यामुळे अंघोळीसाठी कोमट पाणी वापरावे. सौम्य साबणाचा वापर करता येईल. थंडीमध्ये नियमितपणे मॉश्चरायझर, विंटरकेअर लोशनचा वापर करावा. पाणी पिण्याचे प्रमाण कमी करू नका. -डॉ. सुदर्शन गौरकर