कोरोना लस घ्या, मद्यप्राशनाबाबत गैरसमज टाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:24 AM2021-04-07T04:24:46+5:302021-04-07T04:24:46+5:30
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहेस तर दोन दिवस मद्यप्राशन करू नकोस. मासांहार पदार्थ खाऊ नकोस अशा काही ...
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहेस तर दोन दिवस मद्यप्राशन करू नकोस. मासांहार पदार्थ खाऊ नकोस अशा काही सूचना लसीकरणानंतर कानावर पडतात. पण त्याचा लसीकरणाशी संबंध नसल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मांडले आहे. खरे तर लसीकरणानंतर मद्यप्राशन करावे अगर करू नये याबाबत शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना नाहीत. त्यामुळे मद्यप्राशन आणि लसीकरण याचा कोणताही संबंध नसावा असे मत मांडले जात आहे. पण शक्यतो लसीकरणानंतर काही दिवस मद्यप्राशन न केलेले बरे असा मतप्रवाह समाजातून उमटत आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीने मद्यप्राशन केल्यास त्याचा इम्युनिटी पॉवरवर परिणाम होतो अशा काही अफवा समाजात पसरल्या जात आहेत. त्याबाबत अनेक मतप्रवाह दिसून येत आहेत. भारतात दिली जात असणारी कोविड शिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्हीही लस प्रभावी आहेत. लसीकरणानंतर मद्यप्राशन करण्याबाबत समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. त्या अफवावर विश्वास ठेवू नये.
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता लसीकरणासाठी नागरिक पुढे येत आहेत. जिल्ह्यात रोज सरासरी साडेतीन हजार नागरिक लसीकरण करून घेत आहेत. पहिल्या टप्प्यात लस घेतलेल्या पोलीस, आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी आता दुसरा लसीकरणाचा डोस घेतला आहे. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात तीन लाख ६१ हजार लोकांनी लस घेतली. तर २६ हजाराहून अधिकांऱ्यांनी दुसरा डोस घेतला.
यांनी लस घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा..
१) औषधांची अलर्जी असेल तर...
२) गर्भवती महिला
३) बाळाला अंगावरील दूध पाजत असेल तर
४) खाद्यपदार्थाची ॲलर्जी असेल तर
५) स्टेरॉईड औषध (संधीवातावर) घेत असेल तर..
जिल्ह्यात मार्चमधील दारू विक्री (लीटरमध्ये)
देशी दारू : १०,०६,५५३
विदेशी दारू: ५,१९,९८७
बिअर : ४,७०,४५१
आतापर्यत जिल्ह्यात डोस स्थिती
पहिला डोस - ३,६१,६६८
दुसरा डोस : २६,३६५
कोट..
कोरोना लसीकरणानंतर काही दिवस मद्यप्राशन करणे अथवा न करणेबाबत गैरसमज आहेत. रशियात व्होडका पिणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. तेथे लसीकरणानंतर इम्युनिटी पॉवरवर परिणाम दिसला. भारतात कोव्हीड शिल्ड व कोव्हॅक्सीन प्रभावी आहे. त्याचा मद्यप्राशनाशी संबंध नाही. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ. फारुख देसाई, समन्वयक, लसीकरण मोहीम.
कोट..
लसीकरण करताना मद्यप्राशनाबाबत शासनाकडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. अगर मद्यप्राशनाला प्रतिबंधही केलेले नाही. त्याचा तथाकथित काहीही संबंध नसल्याचे दिसून आले आहे. पण लसीकरणानंतर काही दिवस शक्यतो मद्यप्राशन टाळलेले चांगले.
- डॉ. अशोक पोळ, आरोग्याधिकारी, कोमनपा.
कोट..
कोरोना प्रतिबंधक लस आणि मद्यप्राशन याचा कोणताही संबंध नाही. नागरिकांनी गैरसमज बाजूला ठेवून लसीकरणासाठी पुढे यावे.
-डॉ. उमेश कदम, वैद्यकीय अधीक्षक, सेवा रुग्णालय, कसबा बावडा.