कोल्हापूर जिल्हा बॅँकेच्या रिक्त पदांच्या निवडणूका घ्या
By admin | Published: April 26, 2017 06:45 PM2017-04-26T18:45:35+5:302017-04-26T18:45:35+5:30
सहकार मंत्र्यांचे आयुक्तांना आदेश : तीन जागांसाठी निवडणूक होणार
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २६ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तीन रिक्त पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सहकार आयुक्तांना दिले.
गेले दीड वर्षापासून राधानगरी, भुदरगड व चंदगड तालुका विकास संस्था प्रतिनिधींच्या जागा रिक्त आहेत. जिल्हा बॅँकेच्या ४५ माजी संचालक व अधिकाऱ्यांवर कलम ८८ नुसार जबाबदारी निश्चित झाली आहे. बॅँकेवरील प्रशासकीय कारकिर्द संपुष्टात येऊन पावणे दोन वर्षापुर्वी संचालक मंडळ आले. या संचालक मंडळातील २१ पैकी १० संचालक हे जबाबदारी निश्चित झालेले आहेत. त्यांच्यावरील कारवाई सध्या न्यायप्रविष्ट आहे,
मध्यंतरी तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दहा संचालकांना अपात्र ठरवून प्रशासक नियुक्तीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसने के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांचा राजीनामा घेऊन त्या ठिकाणी अनुक्रमे रणजितसिंह पाटील व अर्चना आनंदराव पाटील यांची नियुक्ती केली. पण या नियुकत्या बेकायदेशीर असल्याचे सहकार खात्याचे म्हणणे आहे. त्यानंतर नरसिंग गुरूनाथ पाटील यांचे निधन झाल्याने हे पदही रिक्त आहे.
९७ व्या घटना दुरूस्ती नंतर एखाद्या संस्थेचे संचालक पद रिक्त झाले तर स्विकृत पध्दतीने भरावे की तिथे निवडणूक लावावी, याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे सहकार खात्याची गोची निर्माण झाली आहे. पण मध्यंतरी निवडणूक होऊन अडीच वर्षापेक्षा कमी कालावधी झाला असेल आणि रिक्त पद भरायचे असेल तर तिथे निवडणूक घ्यावी असे परित्रक काढून सहकारी संस्थांचे म्हणणे घेतले होते. याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.
जिल्हा बॅँकेच्या तीन जागा गेले दीड वर्षापासून रिक्त आहेत, िपण सहकार विभागाने काहीच हालचाली केलेल्या नाहीत, तिथे तात्काळ निवडणूक घ्यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी सहकार आघाडीचे अध्यक्ष संजय सावंत व सरचिटणीस अॅड. भरत घोरपडे यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची सोलापूरात भेट घेऊन केली. यावर रिक्त ठिकाणी तात्काळ निवडणूक घेण्याच्या सूचना निवडणूक प्राधीकरणाला कराव्यात, असे आदेश सहकार आयुक्तांना मंत्री देशमुख यांनी काढले आहेत. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या तीन रिक्त पदासाठी लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बॅँकेच्या रिक्त पदासाठी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन निवडणूकीची मागणी केली आहे. त्यांनी तात्काळ सहकार आयुक्तांना आदेश दिले आहेत.
- संजय सावंत (जिल्हाध्यक्ष, भाजप सहकार आघाडी)
रिक्त पदाबाबत प्राधीकरण निर्णय घेते. पण रिक्त पदाबाबत कोणतेही आदेश अद्याप सहकार विभागाकडून आम्हाला प्राप्त झालेले नाहीत.
- धनंजय डोईफोडे (विभागीय सहनिबंधक)