ऊर्जा घेवून जीवन सार्थक करा
By admin | Published: January 10, 2017 12:23 AM2017-01-10T00:23:41+5:302017-01-10T00:23:41+5:30
मानवाला जीवन जगत असताना कालपरत्वे टप्यातील विविध पात्रामधून मार्गक्रमण करीत जावे लागते.
ज्योतिप्रसाद सावंत-- आजरा --प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिनेनाट्य अभिनेत्रींना अस्तित्व टिकविण्याकरिता करावा लागणारा संघर्ष, कारकिर्दीच्या उत्तरार्धात अभिनयापासून दुरावल्याने येणारे नैराश्य, एकाकीपणा आणि पुन्हा ‘अभिनय’ हेच त्यावरचे उत्तम औषध यावर टाकलेला प्रकाशझोत म्हणजे ‘एक्झिट’ हा नाट्यप्रयोग होय.
नाटकाची सुरुवात एकेकाळी प्रसिद्धीच्या शिखरावर असणाऱ्या परंतु सध्या रंगमंचापासून दूर असणाऱ्या नाट्य अभिनेत्री देविका प्रधान यांच्या ‘गप्पांगण’ मधील मुलाखतीने होते.
देविका यांचा रंगभूमीवरील प्रवेशच मूळचा अपघाताने झालेला असतो. गिरीश साळगावकर हा दिग्दर्शक रंगभूमीवर त्यांना ‘लिफ्ट’ देत असतानाच त्यांच्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान, डॉ. प्रधान यांच्याशी देविकांचा विवाह झाल्याने डिवचला गेलेला गिरीश याच्या कुरापती चालूच राहतात. डॉ. प्रधान हे आत्महत्या करतात. डॉ. प्रधान यांचा मृत्यू आत्महत्या की हत्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होऊन वेगवेगळ्या चर्चा होऊ लागतात.
गिरीश यांचे वागणे, डॉ. प्रधान यांचा मृत्यू देविकांना रंगमंचावरून बाजूला करून त्यांना नैराश्य व एकाकीपणाच्या खाईत लोटून देतात. त्यांचे अभिनयापासून दुरावणे त्यांच्या अभिनयाचा चाहता व कधीकाळी सहकलाकार म्हणून काम केलेल्या सारंगच्या पचनी पडत नाही. यातूनच तो डॉ. कारखानीस या प्रधान कुटुंबीयांच्या निकटवर्तीय मनोविकार तज्ज्ञाच्या मदतीने पुन्हा एकवेळ देविका यांना रंगमंचाची दारे खुली करून देतो. नैराश्य व एकाकीपणामुळे नाटकातून ‘एक्झिट’ घेतलेल्या देविका यांचा नाटकातील पुनर्प्रवेश नैराश्य व एकाकीपणातून ‘एक्झिट’ मिळवून देतो अशी या कथेची मध्यवर्ती कल्पना आहे.
श्रीरंग रत्नागिरी यांनी सादर केलेल्या या नाटकाचे अरविंद लिमये यांनी लेखन केले आहे. भाग्येश खरे यांच्या दिग्दर्शनाला देविका प्रधान यांची भूमिका केलेल्या सुप्रिया उकीडवे यांनी केलेल्या अभिनयाने योग्य न्याय दिला आहे. निरंजनची गोपाळ जोशी यांची भूमिक यथोचित राजीव काणे यांनी पार पाडली आहे.
आजरा येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय नाट्य महोत्सवातीत ‘एक्झिट’ या नाट्यप्रयोगातील एक क्षण.