‘त्या’ तरुणीला दोन दिवसांत हजर करा
By admin | Published: May 15, 2016 12:48 AM2016-05-15T00:48:51+5:302016-05-15T00:48:51+5:30
पोलिसांच्या नातेवाईकांना सूचना : तरुणीचा जबाब ठरणार महत्त्वपूर्ण; गुन्हा दाखल होऊ शकतो
कोल्हापूर : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या ‘त्या’ तरुणीला दोन दिवसांत पोलिसांसमोर हजर करण्याच्या सूचना तरुणीच्या नातेवाईकांना दिल्या आहेत. या नवदाम्पत्याच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. ती तरुणी समोर आल्यानंतर यामागचे गूढ उकलणार आहे. तसेच तरुणीचा जबाब नोंदविला जाणार आहे. त्यामध्ये तिने आपले जबरदस्तीने आई-वडील व नातेवाइकांनी अपहरण केल्याचे म्हटल्यास त्यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मातंग समाजातील मुलाने उच्च जातीतल्या तरुणीशी प्रेमविवाह केला. मुलीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांनी मुलीचे अपहरण केले. यासंबधी जुनाराजवाडा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणाची पोलिसांनी बेपत्ता असल्याची तक्रार घेतली. मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांचेही हात ओले केल्याच्या भीतीपोटी तरुणाने अप्पर पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांची भेट घेऊन न्याय मागितला.
तरुणावर ओढवलेल्या अन्यायाविरोधात ‘लोकमत’ने आवाज उठविताच पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. दिवसभर या वृत्ताची जिल्ह्यात चर्चाही जोरदार झाली. अप्पर पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी पोलिस निरीक्षक अनिल देशमुख यांना याप्रकरणी गांभीर्याने लक्ष देऊन संबधित तरुणास न्याय देण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार देशमुख यांनी तरुणीच्या नातेवाइकांशी तत्काळ संपर्क साधून दोन दिवसांत तिला पोलिसांसमोर हजर करण्याच्या सूचना केल्या. संबंधित तरुणी राजस्थानमध्ये आहे. तिच्यावर कुटुंबीयांचे दडपण आहे. पोलिसांसमोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडणार आहे. (प्रतिनिधी)