पाणी योजनेत गैरकारभार करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा
By admin | Published: December 27, 2016 01:02 AM2016-12-27T01:02:59+5:302016-12-27T01:02:59+5:30
‘आंदोलन अंकुश’चे आंदोलन : हलगीवादनासह साखर वाटली
कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील विविध गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी योजना राबविण्यात आली. त्यामध्ये खोटी मोजमापे लावून करोडो रुपये लाटणाऱ्या ठेकेदार व अभियंत्यांवर त्वरित कारवाई करावी. या मागणीसाठी शिरोळ येथील ‘आंदोलन अंकुश’ या संस्थेच्यावतीने कोल्हापुरातील जिल्हा परिषदेच्या कार्यालयाबाहेर सोमवारी दुपारी हलगीच्या कडकडाटात व येणाऱ्या अभ्यागतांना साखर वाटून आंदोलन केले.
शिरोळ तालुक्यातील तेरवाड, कवठेसार, नृसिंहवाडी, आलास, शिरढोण, टाकवडे, लाटवाडी, शिरदवाड, शिवनाकवाडी व गणेशवाडी या गावच्या पाणी योजनांमध्ये झालेल्या गैरकारभाराबाबत आंदोलन अंकुश संस्थेच्यावतीने पाठपुरावा केला जात आहे. त्यात दोनवेळा उपोषण, ठिय्या आंदोलन, एकदा हलगी वादन आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अद्यापही ठेकेदार व संबंधित अभियंत्यांवर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत प्रशासनाने ठोस कारवाई केलेली नाही. याबाबत प्रशासनाच्यावतीने संस्थेला कारवाई सुरू आहे, एवढेच उत्तर दिले जात आहे. अद्यापही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे या संबंधितांवर त्वरित कारवाई करावी. ज्यांनी गैरकारभार केला आहे अशांवर जबाबदारी निश्चित करावी. आलास येथे केलेल्या खुदाईचा दर प्रतिमीटर ५७ ते ७५ रुपये असताना ठेकेदारास २४१ इतका प्रतिमीटर दर दिला आहे. त्यापोटी दिलेले ४८ लाख रुपये ठेकेदाराकडून व संबंधित अभियंत्यांकडून वसूल करावेत. यासह नृसिंहवाडी येथेही १३१ रुपये प्रतिमीटर खुदाई दर असताना तेथे ३८५ रुपये इतका दर दिला आहे. यापोटी ठेकेदारास २६ लाख रुपये अदा केले आहेत. सोमवारी दुपारी बारा वाजता संस्थेच्या कार्यकर्त्यांनी प्रथम मुख्य प्रवेशद्वाराबाहेर येणाऱ्या व जाणाऱ्या अभ्यागतांना साखर वाटून जिल्हा परिषदेचे अभिनंदन केले यासह हलगी वादनही केले. यावेळी पोलिसांनी प्रवेशद्वाराऐवजीबाहेर आंदोलन करा, असे आंदोलनकर्त्यांना सांगितले. अन्यथा ताब्यात घेऊ असा इशारा दिला. यावेळी किरकोळ वादावादी झाल्यानंतर गेटबाहेर आंदोलन केले. या आंदोलनात धनाजी चुडमुंगे, प्रशांत बंडगर, दत्ता मोरे, गुरू खाचरे, दिलीप माणगांवे, प्रवीण पाटील, संजय कुलकर्णी आदींनी सहभाग घेतला.