शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जासाठी पुढाकार घ्या
By admin | Published: August 28, 2016 12:38 AM2016-08-28T00:38:03+5:302016-08-28T00:38:03+5:30
चंद्रकांतदादा पाटील : ‘चौंडेश्वरी’चे पुणे जनता बँकेत विलीनीकरण
इचलकरंजी : राज्यातील सहकार क्षेत्रातील सक्षम बॅँकांनी छोट्या शेतकऱ्यांसाठी सात वर्षे मुदतीचे विना व्याज कर्ज देण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा बिनव्याजी निधी बड्या धनकोकडून उभा करावा. जेणेकरून निर्धन कर्जबाजारी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
शेतकऱ्यांनीसुद्धा अल्प रकमेचे हप्ते बांधून त्याची परतफेड करावी आणि अशा कर्जातून शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन यासारख्या योजना शेतात राबवून शेतीच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करावी, असेही यावेळी पालकमंत्री म्हणाले.
येथील चौंडेश्वरी बॅँकेचे पुणे जनता सहकारी बॅँकेत औपचारिक विलीनीकरणाच्या कार्यक्रमात मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील ७०० पैकी सुमारे १०० सहकारी बॅँका बुडाल्या. त्यामुळे सहकारी बॅँकांवरील जनतेचा कमी होत चाललेला विश्वास जनता बॅँकेसारख्या मोठ्या बॅँकांनी पुन्हा प्रस्थापित करावा. काही अडचणी असलेल्या बॅँका घेऊन त्यांचे पुनरुज्जीवन करावे. तसेच सहकारी बॅँकांनी नवनवीन उद्योगधंद्यासाठी वेगवेगळे प्रकल्प अहवाल तयार ठेवून नवउद्योजक-व्यावसायिक तयार करावेत, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या प्रमुख भाषणात सहकारमंत्री सुभाषराव देशमुख म्हणाले, यंत्रमाग हा राज्यातील शेतीनंतर मोठा रोजगार देणारा उद्योग आहे. तरीसुद्धा मुद्रा योजनेमध्ये यंत्रमाग उद्योगाचा समावेश करून छोट्या यंत्रमाग उद्योजकांना बॅँकांनी अर्थसाहाय्य करावे.
श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला दीपप्रज्वलन झाले. बॅँकेचे अध्यक्ष अरविंद खळदकर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचीही भाषणे झाली. सह महाव्यवस्थापक दिलीप कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व पराग ठाकूर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमासाठी आमदार सुरेश हाळवणकर, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, बॅँकेचे उपाध्यक्ष संजय लेले, बापूसाहेब पुजारी, विठ्ठलराव डाके, श्यामसुंदर मर्दा, सहकार भारतीचे अध्यक्ष प्रकाश गोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
चंद्रकांतदादांचे पाच लाख रुपये
छोट्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी बॅँकांनी पुढाकार घ्यावा. त्याची सुरुवात मी माझ्यापासून करीत असून, या योजनेसाठी पाच लाख रुपये देतो, असे सांगून त्यांनी या योजनेची सुरुवात केली.