'ईडी'च्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 01:10 PM2023-02-06T13:10:53+5:302023-02-06T13:24:30+5:30

चौकशी करत असताना त्यांना शिवीगाळ व अमानुष वागणूक

Take legal action against ED officials, Kolhapur district bank employees complaint to police | 'ईडी'च्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव

'ईडी'च्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा, कोल्हापूर जिल्हा बँक कर्मचाऱ्यांची पोलिसात धाव

googlenewsNext

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी छापे टाकून चौकशी केली, मात्र यादरम्यान त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिलेली वागणूक अमानुष होती. कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण यांच्यासह २२ अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने पोलिस अधीक्षकांकडे केली.

ईडीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह दोन शाखांवर छापे टाकले. त्यांना अपेक्षित माहिती अधिकारी व कर्मचारी देत होते. मात्र, कर्मचाऱ्यांचे मोबाइल काढून घेतले, त्यांचा कोणाशीही संपर्क होऊ दिला नाही. कर्मचाऱ्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना कोंडून ठेवले. तब्बल तीस तास त्यांना झोपूही न देता एकसारखी चौकशी सुरू ठेवली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांना मानसिक व शारीरिक धक्का कर्मचाऱ्यांना बसला, त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला. सुनील लाड या कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटकाही आला. 

तीस कर्मचाऱ्यांना घेऊन चौकशी करत असताना त्यांना शिवीगाळ व अमानुष वागणूक दिली. याला सर्वस्वी ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण व त्यांचे इतर अधिकारी जबाबदार असल्याचे युनियनचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी तक्रारीमध्ये म्हटले आहे. याबाबतची तक्रार त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.

राजकीय व्देषापोटीच कारवाई

कोल्हापूर जिल्हा बँकेने पारदर्शक कारभाराच्या बळावर सर्वाधिक नफा कमावत असताना संपूर्ण राज्यात नावलौकिक मिळवला. याबाबत विविध केंद्रीय व राज्य शासनाच्या यंत्रणेकडून प्रमाणपत्रे मिळालेली असताना केवळ राजकीय व्देषातून बँकेची बदनामी सुरू असल्याचा आरोप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष भगवान पाटील यांनी केला.

Web Title: Take legal action against ED officials, Kolhapur district bank employees complaint to police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.