माजी राज्यपाल कोश्यारींवर कायदेशीर कारवाई करा; शिवसेना ठाकरे गटाचे आयजींना निवेदन
By उद्धव गोडसे | Published: May 16, 2023 05:40 PM2023-05-16T17:40:29+5:302023-05-16T17:40:51+5:30
राज्यात सत्तापालट होताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून काही चुका झाल्याचे निरीक्षण घटनापीठाने नोंदवले.
कोल्हापूर : राज्यात सत्तापालट होताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून काही चुका झाल्याचे निरीक्षण घटनापीठाने नोंदवले. त्याआधारे कोश्यारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने निवेदनाद्वारे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मंगळवारी (दि. १६) केली. तसेच कोश्यारी यांच्या विरोधात पितळी गणपती मंदिर चौकात निदर्शने करण्यात आली.
राज्यातील सत्तापालटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टातील घटनापीठाने निकाल देताना तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निर्णयांबद्दल काही आक्षेप नोंदवले. यावरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आक्रमक बनला असून, कोश्यारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत मंगळवारी विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांच्या कार्यालयात निवेदन दिले. आयजी फुलारी प्रशिक्षण रजेवर असल्याने शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले. तत्पूर्वी कोश्यारी यांच्या विरोधात पितळी गणपती मंदिर चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली.
'सत्तापालटाच्या प्रक्रियेत कोश्यारी यांनी पक्षपात केला. त्यांचे वर्तन घटनेशी सुसंगत नव्हते. संबंधित १६ आमदारांच्या अपात्रतेबद्दल निर्णय होण्यापूर्वीच कोश्यारी यांनी शिंदे गट आणि भाजपला बहुमत सिद्ध करण्यास निमंत्रित केले. याबाबत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी,' अशी मागणी शिवसेनेने निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्यासह सुनील मोदी, रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, महेश उत्तुरे, विराज पाटील, शुभांगी साळोखे, दीपाली शिंदे आदी उपस्थित होते.