पंचगंगा प्रदुषण रोखण्यास उपाययोजना करा, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे कोल्हापूर महापालिकेला निर्देश
By भारत चव्हाण | Published: September 20, 2023 07:21 PM2023-09-20T19:21:32+5:302023-09-20T19:21:57+5:30
जयंती नाला बंधाऱ्यावरून सांडपाणी नाल्याद्वारे पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याचे आढळून आले
कोल्हापूर : जयंती नाला बंधाऱ्यावरून सांडपाणी पंचगंगा नदीत विनाप्रक्रिया जाणार नाही याची दक्षता घ्यावी, चार एमएलडी व सहा एमएलडी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा त्वरित चालू करावी तसेच शहरातील सर्व नाले आडवून ते सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणेकडे नेऊन त्यावर योग्य प्रक्रिया करण्यात यावी, असे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रादेशिक अधिकारी ज.शं. साळुंखे यांनी महानगरपालिकेला बुधवारी दिले.
महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दि. १५ सप्टेबर रोजी जयंती नाला ओव्हरफ्लो होत असताना प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. जयंती नाला बंधाऱ्यावरून सांडपाणी नाल्याद्वारे पंचगंगा नदीमध्ये मिसळत असल्याचे आढळून आले होते. त्याचबरोबर गेली २ वर्षे आपणाकडून ४ एमएलडी व ६ एमएलडी सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा प्रकल्प चालू करणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात दोन्ही सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा प्रकल्प सुरु करण्यात आलेले नाहीत. शहरातील विविध १२ नाल्यापैकी पाच नाले अद्यापही आडवलेले नाहीत. या नाल्याद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पद्धतीने घरगुती सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत आहे. त्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळाने हे निर्देश दिले आहेत.
याबाबत आक्षेप असतील तसेच काही म्हणणे असेल तर निर्देश प्राप्त झाल्यानंतर सात दिवसाच्या आत नोंदवावे, अन्यथा आपल्या विरुध्द पर्यावरण कायद्याअंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही साळुंखे यांनी म्हटले आहे. येथील प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांच्या दूरध्वनीद्वारे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने हे निर्देश देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेळोवेळी महानगरपालिका प्रशासनाला जल प्रदूषण प्रतिबंध विषयक विविध निर्देश जारी केले आहेत. प्रामुख्याने शहरात निर्माण होत असलेल्या सांडपाण्याची प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन उपाययोजना अंमलात आणण्याचे यापूर्वीही निर्देश दिले आहेत.