अरेरावी रोखण्यासाठी लसीकरण केंद्रांवर बंदोबस्त नेमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:21 AM2021-05-01T04:21:43+5:302021-05-01T04:21:43+5:30
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विविध लसीकरण केंद्रांवर अरेरावी करण्याचे प्रकार वाढत आहेत तेव्हा या केंद्रांवर पोलीस बंदोबस्त नेमावा, अशी ...
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या विविध लसीकरण केंद्रांवर अरेरावी करण्याचे प्रकार वाढत आहेत तेव्हा या केंद्रांवर पोलीस बंदोबस्त नेमावा, अशी मागणी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्याकडे शुक्रवारी केली.
फिरंगाई आरोग्य केंद्रावर गुरुवारी एका माजी नगरसेवकांने व त्याच्यासोबत काही लोकांनी केंद्रावरील महिला कर्मचाऱ्यास मारहाण केली. याविरोधात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. लसीकरण सुरू झाल्यापासून लसीकरण केंद्रांवर काही माजी लोकप्रतिनिधी, काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते मर्जीतील नागरिकांना लस देण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे आश्वासन काकडे यांनी दिल्याचे भाजपच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, माजी नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते.