जिल्हा समन्वय समितीच्या बैठका घ्या
By Admin | Published: February 3, 2015 12:23 AM2015-02-03T00:23:49+5:302015-02-03T00:28:21+5:30
चंद्रकांतदादा पाटील : कामगार आयुक्तांना सूचना; असंघटित कामगारांच्या प्रश्नांबाबत बैठक
कोल्हापूर : बांधकाम कामगारांचे प्रश्न सोडविण्यासह कामाच्या सुसूत्रतेसाठी जिल्हा समन्वय समितीच्या बैठका घ्या, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे केली.असंघटित कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा निपटारा होण्याबाबत शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहायक कामगार आयुक्त सुहास कदम, भारतीय मजदूर संघाचे प्रांत संघटक जयंत देशपांडे प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे लाभार्थी म्हणून नोंदणीवेळी घेतले जाणारे कंत्राटदारानी९० दिवसांचे प्रमाणपत्र ज्या कंत्राटदाराने दिले आहे, त्यांचे अभिलेखे तपासावेत. हजेरीपटावर कामगारांच्या नावांची नोंद असल्याची खात्री करून कार्यवाही करावी. महाराष्ट्र दुकाने व संस्था अधिनियम १९४८ अन्वये सदर अधिनियमाच्या तरतुदी लागू करण्याबाबत प्रश्न उपस्थित झाला. त्यावर कामगारमंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्याची ग्वाही दिली. यावेळी सरकारी कामगार अधिकारी संजय महानवर, सुरैय्या थोडगे, जिल्हाध्यक्ष एस. एन. पाटील, संघटक अनुजा धरणगावकर, कोषाध्यक्ष सुधीर मिराशी, कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष सुनीता कांबळे, घरेलू कामगार संघाच्या अनिता लोखंडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)