रुग्णालयात दाखल होताना आवश्यक साहित्य घ्या; धावपळ टाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:13 PM2020-07-20T22:13:11+5:302020-07-20T22:13:21+5:30
- समीर देशपांडे कोल्हापूर : महापालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतींमधून तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात म्हणून तुम्हाला फोन येतो आणि घरातील वातावरण ...
- समीर देशपांडे
कोल्हापूर : महापालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतींमधून तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात म्हणून तुम्हाला फोन येतो आणि घरातील वातावरण बदलून जाते. काही सुचत नाही. घरातील अन्य सदस्यही हबकलेलेच असतात. मग गोंधळून न जाता रुग्णालयात दाखल होताना काय साहित्य घ्यायचे आहे याचा विचार करा आणि ते सोबत घ्या; अन्यथा नंतर इतरांना धावपळ करावी लागते.
तुमच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर अर्ध्या तासातच तुमच्या गल्लीत यंत्रणा दाखल होते. फवारणी सुरू होते. पीपीई किट
घातलेले कर्मचारी चौकशी सुरू करतात. गल्लीत नागरिक हे सर्व पाहत असतात; परंतु याच तणावात आपल्याला लागणाऱ्या वस्तू आठवणीने रुग्णाच्या घरातील सदस्यांनी देण्याची गरज असते. घरातील इतरांना तातडीने स्राव देण्यासाठी नेण्याचा आग्रह सुरू होतो. त्यामुळे अन्य सदस्यही भांबावून जातात. म्हणूनच रुग्णवाहिका येण्याआधी आवश्यक साहित्य घेण्याची गरज असते.
पॉझिटिव्ह रुग्णाने हे घ्यावे
ब्रश, पेस्ट, दंतमंजन - दहा-बारा दिवसांसाठी लागणारे कपडे - एखादे बेडशीट, चादर -काही औषधे सुरू असतील तर ती घ्यावीत -अंघोळीचा, कपडे धुण्याचा साबण, तेल, कंगवा - गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक किटली किंवा थर्मास - काही फळे, बिस्किट - सॅनिटायझर, मास्क आणि ग्लोव्हज
प्रशासनाने ही माहिती द्यावी
प्रशासनाकडून आलेल्या कर्मचाऱ्यांनी शांतपणे रुग्ण आणि नातेवाइकांना काय बरोबर घ्यावे, किती दिवस राहावे लागेल याची थोडक्यात माहिती देण्याची गरज आहे. ही माहिती दिल्यास ते रुग्ण आणि नातेवाइकांसाठी सोयीचे होणार आहे.
रुग्णाच्या घरातील सदस्यांसाठी आवश्यक
संस्थात्मक अलगीकरणात किमान आठ-दहा दिवस राहावे लागते. अहवाल निगेटिव्ह आल्यास स्थानिक प्रभाग समितीच्या पत्रानुसार हॉटेलमध्येही राहता येते. घरी राहण्यासाठी निगेटिव्ह आल्याची प्रत व समितीच्या सचिवांच्या पत्राची गरज असते.
मोबाईलवर बोलत बसू नका, सकारात्मक राहा
आपण पुन्हा निगेटिव्ह येण्यासाठी तुमची तब्येत महत्त्वाची असल्याने शांत झोप आवश्यक आहे. म्हणून मोबाईल सायलेंट करून शांतपणे अधिकाधिक झोप घेण्याचा प्रयत्न करा. घरचा डबा देताना अनेकदा पथ्य पाळले जात नाही. तेथे तुम्हाला दिलेले जेवण हे पुरेसे असते. तेच अन्न खा.