शिवसेनेला सत्तेत घेऊ
By admin | Published: November 1, 2015 01:10 AM2015-11-01T01:10:30+5:302015-11-01T01:16:37+5:30
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडीची सत्ता येणार याबद्दल शंका नाही; परंतु सत्ता आली तरी आमचा पारंपरिक मित्रपक्ष म्हणून आम्ही शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी निमंत्रण देणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
पाटील म्हणाले, ‘सेनेची आमची युती अभेद्य होती त्या काळातही आम्ही जिथे स्वतंत्र लढलो तिथे एकमेकांवर टीका केली आहे. कोल्हापूर महापालिकेत ही टीका जास्त बोचरी होती हे खरे असले तरी त्यावरून शिवसेना लगेच राज्याच्या सत्तेतून बाहेर पडेल, असे मला वाटत नाही. ‘भाजप-ताराराणी’ला ४५ हून जास्त जागा मिळतील; परंतु तरीही शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष असल्याने त्यालाही आम्ही सत्तेत घेऊ.
त्रिशंकू स्थिती शक्य
महापालिका निवडणुकीत दोन्ही काँग्रेस, भाजप व ताराराणी हे प्रत्येकी सरासरी २० जागांच्या जवळ जातील. त्यामुळे या चारपैकी कोणत्याही दोघांना सत्तेसाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागेल, अशी शक्यता राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे. त्याचा अंदाज घेऊनच शिवसेना काँग्रेससोबत जाऊन हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला जाऊ नये म्हणून पालकमंत्र्यांनी नरमाईची भूमिका घेत मैत्रीचा हात पुढे केला असल्याचे चित्र दिसत आहे. (प्रतिनिधी)