अभिमान, अज्ञानता, अविवेकाला दूर ठेवा : रत्नाकर सुरीश्वरजी महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 02:01 PM2019-12-02T14:01:23+5:302019-12-02T14:03:15+5:30
अभिमान, अज्ञान आणि अविवेकाला दूर ठेवा, असे आवाहन मरुधर रत्न आचार्यदेव रत्नाकर सुरीश्वरजी महाराज यांनी केले. भगवान महावीर सेवा धाम ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालय आणि प्रयोगशाळेचे रविवारी सकाळी कसबा गेट येथील नवीन वास्तूत प्रवेश समारंभ त्यांच्या उपस्थितीत पार पडला.
कोल्हापूर : अभिमान, अज्ञान आणि अविवेकाला दूर ठेवा, असे आवाहन मरुधर रत्न आचार्यदेव रत्नाकर सुरीश्वरजी महाराज यांनी केले. भगवान महावीर सेवा धाम ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालय आणि प्रयोगशाळेचे रविवारी सकाळी कसबा गेट येथील नवीन वास्तूत प्रवेश समारंभ त्यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी रतनचंद दिलीपकुमार कटारिया यांच्या हस्ते रुग्णालयाचे उद्घाटन झाले. कलश स्थापना साकळचंद दौलाजी गांधी आणि कुंकुमथापा समारंभ श्रीमती झम्बुवती प्रतापचंद निंबजिया यांच्या हस्ते झाले. यावेळी सेवा, भक्ती आणि समर्पण असे ब्रीद असलेल्या या ट्रस्टच्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी झालेल्या प्रवचनात रत्नाकर सुरीश्वर महाराज म्हणाले, जीवनात सम्यक ज्ञान आवश्यक आहे. श्रद्धा, निष्ठा आणि समर्पित वृत्तीने भगवानांची पूजा केल्यास सार्थकता येईल. स्वामी विवेकानंद, संभवनाथ भगवान, आदींच्या समर्पण वृत्तीचे उदाहरण देत महाराजांनी यावेळी कोल्हापुरातील श्री संभवनाथ जैन श्वेतांबर संघाचे कौतुक केले. पाच वर्षांपूर्वी १ डिसेंबर रोजी याच दिवशी सेवा रुग्णालयाचा शीलान्यास झाला, त्याच दिवशी म्हणजे रविवारी या रुग्णालयाचे नव्या वास्तूत प्रवेश झाल्याचे संदर्भ देत या अनोख्या योगायोगाची माहितीही त्यांनी दिली.
प्रारंभी, श्री संभवनाथ भगवान जैन मंदिरातून वाजत गाजत सर्वांनी रुग्णालयाकडे प्रस्थान केले. तेथे गुरूंचे स्वागत करण्यात आले. दृष्टिबाधित (अंध) गायक सिद्धराज पाटील आणि विनायक पाटील यांनी गुरुवंदना दिली. गुरू उपकार स्मरणानंतर ट्रस्टचे संचालक प्रवीण ओसवाल यांनी प्रास्ताविकात ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालय आणि प्रयोगशाळा या संदर्भातील वैद्यकीय उपक्रमांची माहिती दिली.
रुग्णालयाच्या आवारातील भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन ललितकुमार ओसवाल, श्री मणिभद्रवीर यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती टिपुबाई कोठारी यांनी, तर धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन ओंकारमल कोठारी यांच्या हस्ते झाले. प्रवचनानंतर वास्तुशांती पूजन झाले. या समारंभाचे नियोजन अध्यक्ष विनोद ओसवाल, उपाध्यक्ष संजय गांधी, संचालक उत्तम ओसवाल, नीलेश राठोड, हितेश राठोड, संजय परमार, अशोक ओसवाल, पारस ओसवाल, उत्तम गांधी, सुनील ओसवाल, अमित गुंदेशा, जयंतीलाल ओसवाल, अमर परमार, संतोष गाताडे, आदींनी केले.
कमी दरात आरोग्य सेवा
महावीर सेवाधाम या ट्रस्टच्या सेवार्थ रुग्णालयाचे काम गेली दहा वर्षे सुरू आहे. प्रारंभी गुजरातमध्ये दि. २७ फेब्रुवारी २००९ रोजी हा सेवार्थ रुग्णालय सुरू झाले. नाममात्र फी घेऊन रुग्णांना येथे मोफत औषधे, इंजेक्शन दिली जातात. शहरातील सर्व झोपडपट्ट्यांत तसेच आसपासच्या गावांमध्ये याचा प्रसार होऊन रोज १५० ते १७५ रुग्ण ही सेवा घेऊ लागले. हा प्रतिसाद पाहून ट्रस्टने अत्यल्प दरामध्ये लॅबोरेटरी सुरू केली. लॅबमध्येही रोज १०० ते १२५ रुग्णांच्या रक्त तपासण्या होऊ लागल्या. कसबा गेट येथील एकाच इमारतीमध्ये या सुविधा उपलब्ध होणार आहेत.