संशोधन सामाजिक पातळीवर नेणार

By admin | Published: September 15, 2016 12:41 AM2016-09-15T00:41:11+5:302016-09-15T01:17:44+5:30

एस. पी. गोविंदवार; ‘ग्रीन रिमेडिएशन’मधील संशोधनात शिवाजी विद्यापीठाचा मानदंड प्रस्थापित

To take the research to social level | संशोधन सामाजिक पातळीवर नेणार

संशोधन सामाजिक पातळीवर नेणार

Next

शिवाजी विद्यापीठातील जीवरसायनशास्त्र विभागाच्या औद्योगिक सांडपाणी प्रक्रियाविषयक संशोधनाची दखल केंद्रीय जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने घेतली आहे. हे संशोधन या मंत्रालयाने स्वत:च्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर झळकविले आहे. हा बहुमान मिळवून देणाऱ्या जीवरसायनशास्त्र विभागाची वाटचाल, संशोधन, भविष्यातील उपक्रम, आदींबाबत या विभागाचे माजी प्रमुख व ज्येष्ठ संशोधक डॉ. एस. पी. गोविंदवार यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : जीवरसायनशास्त्र विभागाची वाटचाल कशी झाली ?
उत्तर : शिवाजी विद्यापीठाला संशोधनातील उच्चस्तर पातळी गाठता यावी; तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जीवरसायनशास्त्र विद्याशाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेता यावे या उद्देशाने सन १९८४ मध्ये विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू केला. यानंतर सन १९९६ मध्ये जीवरसायनशास्त्र विभागाची सुुरुवात केली. त्याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सन २००४ मध्ये या विभागाचा मी प्रमुख झालो. यानंतर अन्य अभ्यासक्रमांची आवश्यकता लक्षात घेऊन जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र आणि फूड सायन्स टेक्नॉलॉजी हे विभाग आणि पर्यावरण जैवअभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा प्रारंभ केला. स्थापनेपासून या विभागाने संशोधन अभ्यासक्रमाच्या सुरुवातीच्या दिशेने विकासाची पावले टाकली आहेत. वनस्पतीच्या साहाय्याने औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेबाबतच्या संशोधनात जगात या विभागाने स्वत:सह विद्यापीठाची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्रश्न : संशोधनात विभाग कोणत्या स्थानी आहे?
उत्तर : विभाग आणि वैयक्तिक संशोधनाच्या जोरावर विद्यापीठासाठी आतापर्यंत १५ कोटींचा निधी आणला आहे. वस्त्रोद्योगामधील सांडपाण्याचे
डि-कलरेशनाच्या (रंग काढून टाकणे) संशोधनात विभाग जगात प्रथम क्रमांकावर आहे. स्कोप्स इंडेक्सच्या माध्यमातून ते स्पष्ट झाले आहे. दक्षिण कोरिया, तैवान, आयर्लंड, डेन्मार्क, चायना, सिंगापूरमधील विद्यापीठांमध्ये विभागाचे २५ विद्यार्थी पोस्ट-डॉक्टरेट आणि पाच विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन करीत आहेत. देशात केवळ आपल्याच विद्यापीठात पर्यावरण अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आहे. कौन्सिल आॅफ सायंटिफिक अ‍ॅँड इंडस्ट्रीज रिसर्च (सीएसआयआर), विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी), डीबीटी, डीएसटी, आदी संस्थांच्या माध्यमातून संशोधन प्रकल्प राबविले आहेत. याअंतर्गत मधुमेह, अल्झायमर, अंग थरथरणे, हर्बल ड्रग्ज, बायोइर्न्फोर्मेटिक्स, आदींबाबत संशोधन केले आहे. एखाद्या वनस्पतीच्या कोणत्याही भागावरून विभागातर्फे ‘डीएनए बारकोडिंग’ केले जाते.
प्रश्न : जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने दखल घेतलेले संशोधन नेमके काय आहे?
उत्तर : वस्त्रोद्योगाशी संबंधित कारखान्यांतून जे रंगमिश्रित, प्रदूषित सांडपाणी बाहेर टाकले जाते, त्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी दहा वर्षांहून अधिक काळ प्रयोगशाळेत विभागातर्फे संशोधन केले आहे. रंगमिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करण्यासाठीच्या संशोधनात सूक्ष्मजीव आणि वनस्पतींचा वापर केला. यासाठी विभागपातळीवर ‘पायलट स्केल रिअ‍ॅक्टर’ निर्माण केले. हे संशोधन यशस्वी झाले. यानंतर कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील हाय रेट ट्रान्समिशन सिस्टीमचा वापर करून पायलट रिअ‍ॅक्टरचे रूपांतर फायटो रिअ‍ॅक्टरमध्ये केले. तसेच झेंडू, गलाटा, पाणकणीस, केंदाळ, सायाप्रस, चायना गुलाब, आयपोमिया अ‍ॅक्वेटिका, आदी वनस्पतींचा वापर केला. या पाण्यात वाढणाऱ्या वनस्पती या औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याच्या नाल्यांमध्ये सोडल्या. शिवाय यांत सूक्ष्मजिवांचा वापर केला. यातून सांडपाण्यातील बायोलॉजिकल आॅक्सिजन डिमांड (बीओडी), केमिकल आॅक्सिजन डिमांड (सीओडी) आणि टोटल डिझॉव्हल्ड सॉलिड्स (टीडीएस) हे खूप कमी झाल्याचे तसेच सेंद्रिय पदार्थांचे विकेंद्रीकरण झाल्याचे दिसून आले. प्रक्रिया केलेले हे पाणी शेतीसाठीही वापरता येऊ शकते, हे संशोधनातून स्पष्ट झाले. एक एमएलडी पाण्यावर आम्ही हे संशोधन केले. विद्यापीठाच्या संशोधकांना प्रदूषित सांडपाण्याचे शुद्धिकरण करण्यासाठी पर्यावरणपूरक व कमी खर्चिक तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आले. हे तंत्रज्ञान नागरी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीसुद्धा उपयुक्त ठरू शकते. त्याची सामाजिक उपयुक्तता लक्षात घेऊन जैवतंत्रज्ञान मंत्रालयाने ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून या संशोधनाची दखल घेतली आहे. या संशोधनाद्वारे विभागाने ग्रीन रिमेडिएशनच्या क्षेत्रातील संशोधनात मानदंड प्रस्थापित केला आहे. अधिविभागप्रमुख प्रा. डॉ. ए. यू. अरविंदेकर यांच्या नेतृत्वाखाली या संशोधनाला केंद्रीय मंत्रालयाच्या संकेतस्थळावर मिळालेल्या स्थानामुळे विभागासह शिवाजी विद्यापीठाची जागतिक पातळीवर एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
प्रश्न : संशोधनाबाबतचे भविष्यातील नियोजन कसे आहे?
उत्तर : औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी प्रक्रियेबाबत जीवरसायनशास्त्र विभागाने केलेले संशोधन यशस्वी ठरले. त्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत संबंधित संशोधनाचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी सात एकर जागेत प्रकल्प राबविण्याचे ठरविले आहे. या ठिकाणी झेंडू आणि गलाटा या फुलांची झाडे लावली जातील. या झाडांमुळे जलप्रदूषण कमी करण्यास मदत तर होईलच; शिवाय फुलांचे उत्पन्नदेखील मिळणार आहे. या प्रकल्पात हा विभाग मार्गदर्शकाच्या भूमिकेतून काम करणार आहे. डिपार्टमेंट आॅफ बायोटेक्नॉलॉजीकडून मल्टी इन्स्टिट्युशन्स प्रोजेक्टमध्ये आमचा विभाग काम करणार आहे. वस्त्रोद्योगातील सांडपाण्यातून वीजनिर्मितीचा हा प्रकल्प असून, यात हैदराबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि गुजरातच्या चारोतर युनिव्हर्सिटी आॅफ सायन्स अ‍ॅँड टेक्नॉलॉजी यांच्यासमवेत विभाग काम करणार आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानामध्ये या प्रकल्पाचा समावेश असून, त्यासाठीच्या अनुदानाची रक्कम दोन कोटी ४० लाख इतकी आहे. या प्रकल्पात माझ्यासमवेत जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. ज्योती जाधव, राहुल खंडारे, नीरज राणे, विशाल चंदनशिवे, सुहास कदम हे काम करणार आहेत. विभागामार्फत केले जाणारे संशोधन हे सामाजिक पातळीवर नेणार आहे. या संशोधनाला समाजमान्यता मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे.
- संतोष मिठारी
 

Web Title: To take the research to social level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.