तीळगूळ घ्या, गोड बोला - मकरसंक्रांती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 08:24 PM2021-01-14T20:24:11+5:302021-01-14T20:25:59+5:30
Makarsankrati Ambabaitempe Kolhpaur- आठवण सूर्याची.. साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तीळगूळ घ्या, गोड बोला म्हणत प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा आणणारी मकरसंक्रांत गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्येही सणाचा उत्साह होता, तर करवीर निवासिनी श्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत विशेष बैठीपूजा मांडण्यात आली.
कोल्हापूर : आठवण सूर्याची.. साठवण स्नेहाची, कणभर तीळ, मणभर प्रेम, गुळाचा गोडवा स्नेह वाढवा, तीळगूळ घ्या, गोड बोला म्हणत प्रत्येकाच्या आयुष्यात गोडवा आणणारी मकरसंक्रांत गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्येही सणाचा उत्साह होता, तर करवीर निवासिनी श्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यांची सालंकृत विशेष बैठीपूजा मांडण्यात आली.
सूर्याचा मकरराशीत प्रवेश होतो तो दिवस मकरसंक्रांत म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त गुरुवारी श्री अंबाबाईची हलव्याच्या दागिन्यातील सुंदर पूजा बांधण्यात आली होती. घराघरांत सुवासिनींनी बुडूकलीत बोरं, ऊस, गाजर, वटाणे, शेंगा, तीळगूळ घालून औसा पूजन केले. शिवाय पुरणपोळी, शेंगदाण्याची पोळी असा गोडधोडाचा नैवेद्य दाखवण्यात आला.
एरवी कोणत्याही सणाला निषिद्ध असलेले काळे कपडे मकरसंक्रांतीला मात्र आवर्जून घातले जातात. त्यामुळे महिलांनी काळ्या साड्या, टॉप्स, पंजाबी ड्रेस घातले होते. महाविद्यालयांमध्ये मुलींनी साड्या घालून पारंपरिक वेशभूषा केली होती. इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत सुरू झालेल्या वर्गांमध्येही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून मित्र-मैत्रिणींना तीळगूळ देण्यात आले.
नव्या वर्षात कोरोनाचा संसर्ग एकदमच आटोक्यात आल्याने या सणाचा नागरिकांनी आनंद लुटला. सायंकाळी शेजारी, नातेवाईक, मित्र-मैत्रिणींना तीळगूळ देण्यात आले.
समाजमाध्यमांवरदेखील शुभेच्छा
यानिमित्त समाजमाध्यमांवरदेखील शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भोगीची भाजी-भाकरी, तीळगुळाच्या वड्या, मैत्रिणींसोबतचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत हा दिवस साजरा करण्यात आला.