थोडासा वेळ द्या, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू :हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 04:08 PM2020-01-25T16:08:02+5:302020-01-25T16:10:28+5:30
शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे आमचे वचन आहे, ते आम्ही पाळणारच आहोत; पण विरोधकांना मोर्चे काढायची घाई झाली आहे. चर्चेला बोलावले तरी येत नाहीत, यातून त्यांचा हेतू कळतो, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
कोल्हापूर : शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचे आमचे वचन आहे, ते आम्ही पाळणारच आहोत; पण विरोधकांना मोर्चे काढायची घाई झाली आहे. चर्चेला बोलावले तरी येत नाहीत, यातून त्यांचा हेतू कळतो, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.
दोन वर्षांत छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना पूर्ण करता न आलेले आता आम्हाला महिन्याभरातच जाब विचारत आहेत, अशी टिप्पणीही मुश्रीफ यांनी केली. आमचे सरकार येऊन दोन महिने आणि आम्ही मंत्री होऊन एक महिना होण्याच्या आतच मोर्चे काढत आहात. निदान आम्ही काय करतो हे पाहण्यासाठी थोडा वेळ तरी द्यायला हवा होता, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक स्थायी समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार बैठकीत मुश्रीफ बोलत होते. मी व सतेज पाटील एकाच रेल्वेतून सकाळी कोल्हापुरात आलो. येताना वर्तमानपत्रांत भाजप कर्जमाफीसाठी मोर्चा काढणार असल्याची बातमी वाचली, असा संदर्भ देत मुश्रीफ म्हणाले, मोर्चे काढणाऱ्यांनी सत्तेत असताना कर्जमाफीचा ढीगभर निकष लावून बट्ट्याबोळ केला.
दोन वर्षे झाली तरी त्याचा लाभ अटी-शर्तींतच अडकला. आम्ही आता चांगली कर्जमाफीची योजना राबवीत आहोत, तर हे लगेच ती फसवी आहे, असे म्हणत सुटले आहेत.
मोर्चे काढण्याआधी आमच्याशी चर्चा करा, असे आवाहन आम्ही यापूर्वीच केले आहे. त्याप्रमाणे प्रांताधिकारी व तहसीलदारांमार्फत पत्र पाठवून एक वाजता सर्किट हाऊसवर बैठकीला येण्याचा निरोप दिला; पण त्यांच्याकडून कोणतेही प्रत्युत्तर आले नाही. बैठकीलाही कोण आले नाही, यातून त्यांचा हेतू कळतो अशी टीका मुश्रीफ यांनी केली.
आमचे सरकार कर्जमाफीसंबंधी गंभीर आहे, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, कर्जमाफीचे पैसे एप्रिलमध्ये खात्यावर वर्ग होणार आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचाही प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी उपसमिती नियुक्त केली आहे. त्यांच्याकडे एक लाखाची सवलत देण्याचा प्रस्ताव दिला आहे; पण ५० हजारांपर्यंत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
खावटी, मध्यम मुदत, पाणीपुरवठा संस्था यांचे कर्जमाफ करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांना नुसते कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करण्यासाठी आमचे सर्व प्रयत्न सुरू आहेत.
हाळवणकर आताच कसे काय बोलू लागले?
माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी त्यांचे सरकार असताना गेल्या दोन वर्षांत कर्जमाफीचे काय झाले आहे याची साधी कधी विचारणाही केली नाही आणि आता ते आमचे सरकार येऊन दोन महिने होत नाहीत तोवर आम्हाला विचारू लागले आहेत, याला काय म्हणायचे ते तुम्हीच ठरवा, असा टोलाही मंत्री मुश्रीफ यांनी हाणला.
हाळवणकर बिचारे काय करणार?
सुरेश हाळवणकर भाजप शहराध्यक्षांच्या निवडीवेळी ‘दादा, तुमचा हात माझ्या डोक्यावर असता तर....’ असे म्हणाले होते. अशा अवस्थेत सापडलेले हाळवणकर हे बिचारे आहेत, ते काय करणार? अशी खिल्लीही मुश्रीफ यांनी उडविली.
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार
फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे. यात काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर नक्कीच कठोर कारवाई होईल, असे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. कोरेगाव-भीमा प्रकरणी पुढील आठवड्यात पुन्हा एकदा आठवडा बैठक होणार आहे.