अलमट्टीच्या उंचीविरोधात रस्त्यावर उतरू : चंद्रकांत पाटील यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 04:51 PM2020-08-27T16:51:07+5:302020-08-27T16:52:12+5:30
कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे वस्तुस्थिती केंद्रीय नेतृत्वाला समजून सांगू; मात्र वेळ पडली तर याविरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागे पडणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
कोल्हापूर : कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची ५२४ मीटरपर्यंत नेण्याचा प्रयत्न झाला, तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसेल. त्यामुळे वस्तुस्थिती केंद्रीय नेतृत्वाला समजून सांगू; मात्र वेळ पडली तर याविरोधात रस्त्यावर उतरण्यासही मागे पडणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे मंगळवारी (दि. २५) जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात पाटील म्हणतात, सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या लवादाचे आदेश, तांत्रिक बाबी, आजवरची पुराची आकडेवारी तपासूनच याबद्दलचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागेल. कोल्हापूर जिल्ह्यातील शेती, वित्त आणि जीवित मालमत्ता यांची हानी होणार नाही, याची काळजी घेणे ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे.
मुळात अलमट्टी धरणाबद्दलच्या काही बाबी न्यायप्रविष्ट आहेत. हा महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांशी संबंधित विषय आहे. त्यामुळे पंतप्रधान किंवा केंद्र सरकार घाईगडबडीने किंवा एकांगी निर्णय घेणार नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका कायम ठेवली, तर त्यांनाही पश्चिम महाराष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाची कल्पना देऊ.
कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रावर महापुराची टांगती तलवार कायम राहणार नाही, यासाठी दक्ष राहू. गतवर्षीच्या महापुराची भीषणता, त्यातून झालेले नुकसान यांची पूर्ण जाणीव असल्याने, या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.