लस घ्या, अन्यथा रेशन, परवाने देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:24 AM2021-04-08T04:24:11+5:302021-04-08T04:24:11+5:30
शिरोली : ज्यांनी लसीकरण केलेले नाही, त्यांना रेशनचे धान्य देऊ नये. तसेच ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयातील दाखले, परवाने ...
शिरोली
: ज्यांनी लसीकरण केलेले नाही, त्यांना रेशनचे धान्य देऊ नये. तसेच ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयातील दाखले, परवाने देण्यात येणार नाहीत, असा निर्णय टोप ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनास अटकाव करण्यासाठी टोपमध्ये दक्षता समितीची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सरपंच रूपाली तावडे होत्या.
सर्व ग्रामस्थांनी लसीकरण करून घ्यावे, जे लस घेणार नाहीत अशा ग्रामस्थांना ग्रामपंचायतीमधील दाखले, तलाठी कार्यालयातील उतारे व इतर कागदपत्रे तसेच रेशन धान्यही देण्यात येऊ नये, अशी सूचना सरपंचांनी केली. जे व्यावसायिक लस घेणार नाहीत, त्या व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवावेत, अशा सूचना देण्यात येणार आहेत. परजिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना काही दिवस क्वारंटाइन राहून काळजी घ्यावी. गावात कोणतेही मोठे कार्यक्रम होणार नाहीत, याची काळजीही दक्षता समितीने घ्यायची आहे. एखादा पॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरत असेल तर त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सरपंच रूपाली तावडे, उपसरपंच संग्राम लोहार, विठ्ठल पाटील, तलाठी जयसिंग चौगले, पांडुरंग पाटील, राजू कोळी, पोलीस पाटील महादेव सुतार, विनोद पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. आर. देवकाते, रेशन धान्यधारक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.