वाहनांच्या टायरची घ्या मुलाप्रमाणे काळजी, नियमित हवा, देखभाल गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 10:31 AM2019-06-05T10:31:22+5:302019-06-05T10:35:13+5:30
वारंवार टायर फुटून चारचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाणित दिलेल्या इतकीच हवा भरणे, ताशी ५० कि. मी.ची वेगमर्यादा पाळूनच वाहन हाकणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न भरणे, आदी प्रकारची काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात, असे मत अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.
कोल्हापूर : वारंवार टायर फुटून चारचाकींचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात टायरची योग्य ती काळजी न घेतल्याने अपघातांचे प्रमाण वाढू लागले आहे. प्रमाणित दिलेल्या इतकीच हवा भरणे, ताशी ५० कि. मी.ची वेगमर्यादा पाळूनच वाहन हाकणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी न भरणे, आदी प्रकारची काळजी घेतल्यास अपघात टाळता येतात, असे मत अभ्यासकांतून व्यक्त होत आहे.
बेळगाव येथे औरंगाबादहून गोव्याकडे जाण्यासाठी निघालेली चारचाकी टायर फुटून त्यातील सर्वच्या सर्व सातजण ठार झाले, अशा एक ना अनेक घटना राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी वारंवार घडत आहेत. एकूणच चारचाकी चालविणाऱ्यांच्या ऐरणीवर असलेल्या हा विषय आहे; त्यामुळे टायर हे चारचाकीचे महत्त्वाचे अंग आहे.
विशेष म्हणजे दीर्घ प्रवासासाठी जाताना वाहनांच्या टायर तपासणी आवश्यक आहे. यात हवा, व्हील अलायमेंट, टायरचे थ्रेड, आदींबाबत वाहन चालकाने जागरूक असणे गरजेचे आहे. तरच अपघात टाळता येऊ शकतात आणि वित्त व मनुष्यहानी टाळता येऊ शकते.
काय करू नये
- प्रवास करताना गाडीच्या क्षमतेपेक्षा जादा प्रवासी भरून प्रवास करू नये
- एकसारखा दीर्घ प्रवास करू नये.
- वाहन चालविताना खड्ड्यातून वेगाने जाऊ नये.
- ५० कि. मी. प्रतितासांपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवू नये.
- टायरचे थ्रेड निघण्यास सुरुवात झाल्यानंतर किंवा तीन वर्षांपेक्षा अधिक काळचा टायर असल्यास तपासणी न करता प्रवास करू नये.
- टायर हार्ड झाल्यास प्रवास करू नये.
- चार चाकांपैकी एका चाकातील हवा कमी होते, असे जाणवल्यास वाहनचालकाने वाहन रस्त्याकडेला घेणे आवश्यक आहे. टायर फुटण्याअगोदर वाहनाचा चारपैकी एक कोपºयात दाब कमी झाल्यासारखा जाणवल्यास तत्काळ वाहन बाजूला घेणे.
टायरची काळजी अशी घ्या
- वर्षाला १० ते १५ हजार मैल प्रवास केल्यास टायर बदलणे गरजेचे आहे.
- टायरमधील हवा नियमित तपासणे.
- टायरचे स्टड, थे्रड चांगले आहेत की नाही हे पाहणे.
- क्षमतेपेक्षा जादा भार वाहनांवर पडेल, असे कृत्य करू नये.
- नियमित व्हील अलायमेंट करावे.
- घाट, ओबडधोबड रस्त्यावरून प्रवास करताना वाहन काळजीपूर्वक चालविणे.
- वाहनांची योग्य वेग मर्यादा पाळणे.
- दीर्घ प्रवास करून आल्यानंतर वाहनातील टायरची हवा तपासून घेणे.
- ६०००-८००० कि. मी. प्रवास झाल्यानंतर टायर फिरवून बसविणे गरजेचे आहे.
- पुढील टायर २० हजार मैल, तर मागील टायर ४० हजार मैल प्रवास झाल्यास बदलणे गरजेचे आहे.
- भाडे तत्त्वावर वाहन घेतल्यानंतर त्या वाहनातील टायर प्रथम तपासून प्रवासाला सुरुवात करणे.
महिन्यातून किमान एकवेळा तरी चारचाकी चालकाने वाहनांच्या सर्व टायर्स तज्ज्ञांकडून तपासून घेणे गरजेचे आहे. विशेषत: २० हजार मैल प्रवास झालेल्या टायरबाबत अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. टायरमधील हवेचे प्रमाण योग्य ठेवणे अत्यावश्यक बाब आहे.
- तुकाराम खोंदळ,
टायर विक्रेते, कोल्हापूर