सहा महिन्यांनंतर मुंबई-कोल्हापूर विमानसेवेचे टेकऑफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 06:47 PM2020-10-27T18:47:39+5:302020-10-27T19:12:53+5:30
CoronaVirus, airplain, kolhapurnews कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारी मुंबई-कोल्हापूर या मार्गावरील विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. पहिल्या दिवशी ५५ जणांनी प्रवास केला. तिरूपती-कोल्हापूर मार्गावरील विमानसेवा दिवाळीनंतर सुरू होणार आहे.
कोल्हापूर : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असणारी मुंबई-कोल्हापूर या मार्गावरील विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू झाली. पहिल्या दिवशी ५५ जणांनी प्रवास केला. तिरूपती-कोल्हापूर मार्गावरील विमानसेवा दिवाळीनंतर सुरू होणार आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर देशाअंतर्गत विमानसेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर हैदराबाद-कोल्हापूर-हैदराबाद आणि हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर या मार्गावरील विमानसेवा सुरू झाली; पण तांत्रिक कारणामुळे कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सेवा सुरू झाली नव्हती. ही तांत्रिक अडचण दूर झाल्याने ट्रुजेट या कंपनीने मुंबई-कोल्हापूर मार्गावरील विमानसेवा मंगळवारपासून पूर्ववत सुरू केली.
मुंबईहून निघालेले विमान कोल्हापूरमध्ये दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी पोहोचले. मुंबईहून ३० प्रवासी आले. त्यामध्ये मराठी अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे आणि त्यांच्या पत्नी नीलिमा यांचा समावेश होता. कोल्हापुरातून दुपारी ३ वाजून १० मिनिटांनी या विमानाने मुंबईच्या दिशेने उड्डाण केले.
मुंबईला २५ प्रवासी गेले. ही विमानसेवा आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी तीन दिवस असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रवाशांसाठी फेसशिल्ड, मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था केली होती. या विमानातून प्रवास करणाऱ्यांनी विमानतळावर सेल्फी घेत आनंद व्यक्त केला.