कामगारांच्या सुरक्षेची ऐसी की तैसी

By admin | Published: November 2, 2014 09:57 PM2014-11-02T21:57:50+5:302014-11-02T23:30:46+5:30

कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये दिवसेंदिवस अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढू लागले

Taking the safety of workers such a thing | कामगारांच्या सुरक्षेची ऐसी की तैसी

कामगारांच्या सुरक्षेची ऐसी की तैसी

Next

बालेचॉँद हेरवाडे - पट्टणकोडोली -योग्य प्रशिक्षण व कामगारांच्या सुरक्षिततेच्या नियमाला धाब्यावर बसवून कंपनी प्रशासन वर्क आॅर्डर वाढविण्यासाठी कामगारांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार करत आहेत. धोकादायक परिस्थितीमध्ये मृत्यूची टांगती तलवार डोक्यावर घेऊनही अनेक फौंड्री कंपन्यांमध्ये कामगार काम करीत आहेत. त्यामुळे कागल-हातकणंगले पंचतारांकित एमआयडीसीमध्ये दिवसेंदिवस अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढू लागले आहे.
कागल-हातकणंगले फाईव्हस्टार एमआयडीसी हजारो बेरोजगारांसाठी विकासाची पर्वणी ठरत असली तरीही प्रशिक्षित ठेकेदार आणि सुरक्षिततेच्या उपाययोजनाकडील दुर्लक्षामुळे अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहे. याठिकाणी फौंड्री कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून जॉब (पार्ट) तयार करत असताना धातूचा रस (पोरींग) ओतणीपासून, नॉकआऊट, मोल्डींग, मेल्टींग, फिटलिंग, कोअर शॉप व लोडींग अशी धोकादायक कामे करावी लागतात. ही कामे करत असताना कामगारांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट, बूट, हॅन्डग्लोज व गॉगल्स देणे कंपनीला बंधनकारक आहे. मात्र बहुतांशी कंपन्यांमध्ये हे नियम धाब्यावर बसवून कामगारांना केवळ बूट व हॅन्डग्लोज पुरवले जातात. केवळ ग्रुप इन्शोरन्सच्या जोरावर कामगारांकडून धोकादायक कामे करून घेतली जातात. अपघातात यामध्ये काहींना प्राण गमवावे लागले आहेत. तर काहींना अपंगत्वाला सामोरे जावे लागले आहे. गेल्या वर्षभरात पट्टणकोडोली येथील दोघा कामगारांना जीव गमवावा लागला आहे. कामगारांना सुरक्षिततेच्या उपाययोजना मिळत नसल्याने अनेकवेळा तक्रारी करूनही प्रशासन याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करत असून केवळ सुरक्षिततेचे प्रमाणपत्र देण्यापलीकडे कोणतीच ठोस पावले उचलली नाहीत.
दरम्यान, फौंड्री कंपन्यांमध्ये परप्रांतीय कामगारांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघातातून मृत्यू झालेली अथवा अपंगत्व मिळालेल्या कामगारांची प्रकरणे दडपली जातात. तसेच अनेक कंपन्यांकडून हितसंबंध जपण्यासाठी ठेकेदारांच्या नावावर कंपनी प्रशासन स्वत:च ठेका चालवत आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेकडे कानाडोळा करणाऱ्या अशा कंपन्यांवर सहायक कामगार आयुक्त व सहसंचालक यांनी प्रत्यक्षात तपासणी करून कारवाई करण्याची मागणी वाढत आहे.
कंपनी प्रशासन केवळ उत्पादन वाढविण्यासाठी स्थानिक विना परवाना ठेकेदारांना कामाचे ठेके सर्रास देत आहेत. संबंधित ठेकेदारांच्या कामातील अनुभव कमी असल्याने संभाव्य धोक्यांचाही अंदाज नसतो. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस पावले उचलली जात नाहीत. केवळ प्रति कामगारांमागील कमिशन मिळविण्याच्या प्रयत्नात कामगारांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकारही घडत आहे.

Web Title: Taking the safety of workers such a thing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.