नागदेववाडीतील वंचित पूरग्रस्त ग्रामस्थांकडून तलाठी धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:27 AM2021-08-24T04:27:30+5:302021-08-24T04:27:30+5:30
कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर ...
कोपार्डे : नागदेववाडी (ता. करवीर) येथील पूरग्रस्त ग्रामस्थांची नावे तलाठ्यांनी परस्पर सानुग्रह यादीतून वगळल्याचे समजताच पूरग्रस्त ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. सोमवारी नागदेववाडीतील वंचित ग्रामस्थांनी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात तलाठी जयवंत काटकर यांना भेटून धारेवर धरले व पहिल्या यादीतील पूरग्रस्तांची वगळलेली नावे कोणाच्या सांगण्यावरून वगळली, असा जाब विचारत धारेवर धरले.
यावेळी सरपंच योगेश ढेंगे व ग्रामस्थांनी तलाठी काटकर यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे नाईलाजास्तव तहसीलदारांना या यादीची माहिती देतो, असे सांगून ग्रामस्थांना तहसीलदार कार्यालयाकडे तलाठी काटकर घेऊन गेले. परंतु, तहसीलदार व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये असल्याने बराचवेळ ग्रामस्थांना येथे तिष्ठत बसावे लागले.
दि. २२ जुलैला मुसळधार पाऊस झाल्याने नागदेववाडीत महापुराचे पाणी नागरी वस्तीत घुसले होते. २०१९पेक्षाही यावर्षी जास्त आलेल्या पुरामुळे पाणी पातळी वाढली होती. यामुळे नागदेववाडीतील ढेंगे गल्ली, ढेरे गल्ली, निगडे गल्ली, दिवसे गल्ली, मोहिते गल्लीतील तीनशे ते सव्वातीनशे घरांमध्ये महापुराचे पाणी शिरले होते. यावेळी ग्रामसेवक, ग्रामपंचायत व तलाठी यांनी महापुराची पाहणी करून पूररेषा आखली होती. प्राथमिक यादीत ३१७ पूरग्रस्तांची सानुग्रह अनुदानासाठी यादी तयार केली होती. पण दुसऱ्या यादीत यातील ८० पूरग्रस्तांची नावे वगळून निर्वाह यादीत समाविष्ट केली. यामुळे ग्रामस्थांनी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक बोलावून तलाठ्यांना फोन केले. पण तलाठी नागदेववाडीत आले नाहीत म्हणून वंचित पूरग्रस्त ग्रामस्थ शिंगणापूर येथे असलेल्या तलाठी कार्यालयात गेले.
यावेळी सरपंच योगेश ढेंगे यांनी कोणाच्या सांगण्यावरून ८० पूरग्रस्तांची नावे वगळली, असा प्रश्न केला. यावर तलाठ्यांनी यादी जाहीर केली नसल्याचा बनाव केला. त्यावर सरपंच ढेंगे यांनी ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केलेली यादी कुठली, असा प्रश्न केला. राजेंद्र दिवसे म्हणाले, तुम्ही पुराच्या काळात नागदेववाडीतील पूरस्थितीची पहाणी केली. यावेळी ग्रामसेवक, पोलीस पाटील यांनी यादी तयार केली. पूरग्रस्तांची नावे वगळताना ग्रामसेवकांबरोबर चर्चा केली होती का? तुमचे या यादीवर एकमत झाले नाही का? असा प्रश्न केला. यावेळी तलाठ्यांनी घुमजाव करत पंचनाम्याच्या यादीवर तहसीलदार कार्यालयात चर्चा करुया, असे म्हणून ते ग्रामस्थांना घेऊन या कार्यालयात गेले.
फोटो
१) नागदेववाडीतील ग्रामस्थांनी शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात तलाठी जयवंत काटकर यांना धारेवर धरले.