प्रतिभावंत लोकशाहीर कुंतीनाथ करके यांचे निधन; पाच दशकांची शाहिरी : महाराष्ट्र सारस्वतास मुकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:27 AM2021-03-23T04:27:05+5:302021-03-23T04:27:05+5:30
कोल्हापूर-हेरले : महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतील प्रतिभावंत लोकशाहीर अशी ओळख असलेले महाराष्ट्र शाहीर कुंतीनाथ देवेंद्र करके (वय ८५, रा. हेरले, ...
कोल्हापूर-हेरले : महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेतील प्रतिभावंत लोकशाहीर अशी ओळख असलेले महाराष्ट्र शाहीर कुंतीनाथ देवेंद्र करके (वय ८५, रा. हेरले, ता. हातकणंगले) यांचे रविवारी मध्यरात्री दोन वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील शाहिरी परंपरेतील शब्दप्रभू हरपला, अशी भावना व्यक्त झाली. त्यांनी शाहिरीशिवाय कथाकथन, अनेक मराठी चित्रपटांसाठी गीत लेखन, पटकथा संवाद लेखन व व्यक्ती चरित्र लेखन, असे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा सिव्हिल इंजिनिअर अभिनंदन, दोन विवाहित मुली असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी आहे.
त्यांचा जात व गावगाड्याचा प्रचंड अभ्यास होता. सुमारे पाच दशकांहून अधिक काळ शाहिरी केली. व्ही. शांताराम, आचार्य अत्रे, दुर्गाबाई खोटे, यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर शाहिरी कार्यक्रम करून वाहवा मिळविली. महाराष्ट्र शाहीर परिषदेने त्यांना गौरविले होतेच, शिवाय राज्य शासनानेही उत्कृष्ट शाहीर म्हणून त्यांचा सन्मान केला होता. दिवंगत नेते बाळासाहेब माने यांच्यापासून ते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यापर्यंत त्यांचे अनेक राजकीय नेत्यांशी चळवळीच्या माध्यमातून नाते होते.
पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे जनक डॉ. बापूजी साळुंखे यांचा गुरुसहवास लाभला. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होताच ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झाले. ज्ञानदानाचे कार्य करीत असताना संस्थेच्या प्रगतीमध्ये मोलाचे सहकार्य दिले. यातूनच त्यांना लाभलेल्या शाहिरी कलेचीही त्यांनी जोपासना केली. आजवर अनेक विषयांवर, व्यक्तिमत्त्वावर, इतिहासावर रचलेले आणि गायलेले पोवाडे अजरामर झाले आहेत. उमेदीच्या काळात त्यांनी शाहिरी झंकार, हे शाहिरी काव्य, तर ‘येडं पेरलं खुळं उगवलं’ हे विनोदी नाटक प्रसिद्ध झालं होतं. त्यांच्या रचनेला आणि वाणीला
वेगळीच धार असल्याने महाराष्ट्रातील श्रोत्यांना आजही मंत्रमुग्ध होण्याची भुरळ पडते. त्यांनी बऱ्याच मराठी चित्रपटांमध्ये
गीतरचना केली आहे. स्वत: शेतकरी कुटुंबात घडलेलं पिंड असल्याने करके यांनी मातीशी कधी नाळ तोडली नाही. सेवानिवृत्तीनंतर शेतीवर लक्ष दिले होते. त्यातूनच जीवनातील अनुभवलेल्या प्रसंगांचं आत्मकथन साकारलं जात होते. त्यांचे पाझर, चैत्रपालवी, कांचनकुंम, जलधारा इत्यादी काव्यसंग्रह आणि कथा ही महावीरांची हा चरित्र ग्रंथ लिहिला आहे. त्यांच्या अनेक देवतांच्या गाण्यांच्या कॅसेटस् प्रसिद्ध झाल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत गंगू बाजारला जाते, औंदा लगीन करायचं, बोला दाजिबा, सख्या सजना, बायको आली बदलून, अन्याय, प्रतिकार, सुळावरची पोळी, सोंगाड्या इत्यादी चित्रपटात गाणी लिहिली. त्यांना शासनाचा दलितमित्र पुरस्कारही मिळाला होता.
दुर्गाबाई खोटे यांची रुपयाची भेट
गणूचा गोंदा... सोडून धंदा. रिकामां गावात फिरतोय रं.. अनू आईकडे रुपाया मागतोय रं.. असे बदलत्या समाजव्यवस्थेतील
वास्तवतेवर विनोदी रचनेतून प्रकाश टाकणारे गीत त्यांनी शाहू खासबाग मैदानात गायले. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ विदूषी दुर्गाबाई खोटे यांनी करके यांना एक रुपयाची दौलतजादा दिली. व्ही. शांताराम यांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.