तळगाव ग्रामस्थ करणार रस्त्यासाठी उपोषण, लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 03:13 PM2021-04-16T15:13:21+5:302021-04-16T15:27:46+5:30
Road Kolhapur : बुरंबाळी फाटा ते दुर्गमानवाड या रस्त्याला जोडणारा तळगाव - कुदळवाडी रस्ता येत्या महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा आज येथील तरुणांनी दिला. रस्त्याबद्दलच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत तरुणांनी लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक आमच्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला.
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड/कोल्हापूर : बुरंबाळी फाटा ते दुर्गमानवाड या रस्त्याला जोडणारा तळगाव - कुदळवाडी रस्ता येत्या महिन्याभरात खड्डेमुक्त न केल्यास गावात कोणत्याही लोकप्रतिनिधीला फिरू देणार नसल्याचा इशारा आज येथील तरुणांनी दिला. रस्त्याबद्दलच्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत तरुणांनी लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक आमच्या ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. हा रस्ता म्हणजे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हेच कळेना असे झाल्याची प्रतिक्रिया नोंदवत तरुणांनी रस्ता खड्डेमुक्त न झाल्यास बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
बुरंबाळी दुर्गमानवाड रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर असणारे तळगाव अत्यंत ग्रामीण व दुर्गम गाव. गेल्या कित्येक वर्षापासून या गावाला रस्ताच झालेला नाही. एकदा डांबरीकरण झालेले आहे. पण या रस्त्याची दयनीय अवस्था पाहून या रस्त्या डांबरीकरण झालेले आहे का असा प्रश्न पडतो.
२०१८-१९ रोजी गावातील अंतर्गत रस्त्याचा सात लाख पन्नास हजार रुपयाचा निधी मुख्य रस्त्यावरती वळवत ग्रामपंचायतीने स्वतःहून या रस्त्याची डागडुजी केली होती. पण तोही रस्ता गुणवत्ते अभावी कुचकामी ठरला. अवघ्या वर्षातच त्याच्यावरचे डांबर बाजूला गेले आहे. आमदार फंडातून २०१९ रोजी या रस्त्यावरती नऊ लाख नव्व्यानव हजार रुपये खर्च केल्याचा रस्त्यावरती लावलेला बोर्ड सांगतो. पण या रस्त्याकडे बघितले असता खरंच हा निधी या रस्त्यावर खर्च झाला आहे का? असा प्रश्न पडतो. पावसाळ्याचे दिवस सुरू होतील, तेव्हा या रस्त्याची अजून दयनीय अवस्था होईल.
या मार्गावर एकच बस ये-जा करत असते. पण रस्त्याची अवस्था फार दयनीय झाल्याने एसटीच्या फेऱ्याही बंद झाल्या आहेत . त्यामुळे संतप्त झालेल्या गावातील सर्व तरुण मंडळाच्या तरुणांनी एकत्र येऊन आज रस्त्यावर आंदोलन केले. येत्या महिनाभरात या रस्त्याची डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे इशारा या तरुणांनी आज दिला.
यावेळी संजय तवनकर, विठ्ठल पाटील, मारुती पाटील, रमेश कांबळे, सुनील पाटील,शशांक पाटील, साताप्पा नाळे, धनाजी पाटील,सतीश पाटील, युवराज पाटील, किरण पाटील, आदींसह गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते .