कारवाईचे बोला, अन्यथा कोंडून घालू
By admin | Published: March 20, 2015 11:30 PM2015-03-20T23:30:08+5:302015-03-20T23:41:01+5:30
पंचगंगा प्रदूषण प्रश्न : बैठकीत इशारा, कारवाईवर सकारात्मक चर्चा, अधिकारी धारेवर
कोल्हापूूर : पंचगंगा प्रदूषणास जबाबदार असणाऱ्या घटकांवर काय कारवाई करणार ते बोला, खुलासा नको, अन्यथा कुलूप आणले आहे. तुम्हाला कोंडून घालू, असा इशारा शुक्रवारी स्वाभिमानी युवा आघाडी व पर्यावणप्रेमींनी दिला. त्यानंतर पुढील बैठकीत कारवाईचा अहवाल दिला जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी त्वरीत उपाययोजना व दोषींवर कारवाई यासंबंधी शासकीय विश्रामगृहात बैठक झाली. बैठकीस जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी अधिकारी गैरहजर होते. त्यावर सुरुवातीला जोरदार आक्षेप घेतला. प्रदूषणासंबंधित जिल्हा प्रशासनाला गांभीर्य नसेल तर बैठक का आयोजित केली, असा प्रश्न ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी उपस्थित केला. जोपर्यंत सर्वच विभागाचे सक्षम अधिकारी येणार नाहीत तोपर्यंत बैठक सुरू होणार नाही, असा पवित्रा साऱ्यांनीच घेतला. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी मनिष होळकर यांनी मोबाईलवरून जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. बैठकीला सुरुवात झाली. ‘स्वाभिमानी’चे युवा अध्यक्ष बंडू पाटील यांनी व्यासपीठावर बसलेले सर्वच प्रदूषणाला दोषी असून, चोर आहेत, असा थेट आरोप केला.
पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई काय करणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी लावून धरली. त्याला साऱ्यांनी पाठिंबा दिला. पंचतारांकित वसाहतीतील दूषित पाण्यामुळे पंचगंगा प्रदूषित होत असल्याचे बंडू पाटील, संदीप बुधवले यांनी निदर्शनास आणून दिले.
औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी के. एस. भांडेकर यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शिवसेनेचे विजय देवणे यांनी आधी माहिती घ्या आणि नंतर बोला, अशी समज दिली. ते म्हणाले, भोगावती, कुंभी, दालमिया, रेणुका, राजाराम हे साखर कारखाने मळीमिश्रीत पाणी नदीत सोडत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी.
कुठे आहेत जिल्हाधिकारी ?
‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. प्रदूषणावर १५ वर्षांपासून लढत आहे. उच्च न्यायालयात गेलो आहे. अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. बैठकीला गैरहजर राहणारे जिल्हाधिकारी कुठे आहेत, असा सवाल दिलीप देसाई यांनी केला.
न्यायालयाचा अवमान
इचलकरंजी नगरपालिकेने प्रदूषणप्रश्नी उच्च न्यायालयातील सुनावणीत दूषित पाणी पंचगंगा नदीत मिसळत नाही, असे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. शुक्रवारी सकाळी थेट दूषित पाणी पंचगंगेत मिसळत असल्याची क्लीप माझ्याकडे आहे. त्यामुळे इचलकरंजी मुख्याधिकाऱ्यांनी खोटे प्रतिज्ञापत्र देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे, असा आरोप बंडू पाटील यांनी केला.
इचलकरंजीतील प्रदूषित कारखान्यांचा सर्व्हे होणार
बैठकीत निर्णय : ‘प्रदूषण’, नगरपालिका, ‘औद्योगिक’ संयुक्त मोहीम राबवणार
कोल्हापूर : इचलकरंजी शहरातील कपड्यांवर विविध प्र्रकारे प्रक्रिया करणारे उद्योग किती आहेत. कोणत्या उद्योगांकडून प्रदूषित पाणी प्रक्रिया न करता बाहेर सोडले जाते यांचा सर्व्हे तीन ते चार दिवसांत प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ, नगरपालिका, वीजवितरण कंपनी यांनी संयुक्तपणे करण्याचा निर्णय झाला.
पाटबंधारे विभागाने नदीकाठावरील शेतकऱ्यांची पाणीपट्टी पाटबंधारे विभागाने मागू नये, आम्ही देणार नाही. पावसाळ्यात पुराचा आणि उन्हाळ््यात प्रदूषित पाण्याची समस्या शिरोळ तालुक्यात निर्माण होत आहे. त्यामुळे शिरोळ तालुका आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर करा, असे बंडू पाटील यांनी मागणी केली.
मुख्याधिकारी पवार यांनी प्रदूषण करणारे निदर्शनास आल्यास कारवाई केली जात आहे. साईदीप इंडस्ट्रीजचे दूषित पाणी पंचगंगेत मिसळत असल्याची माहिती घेतो, असे सांगितले. डोके म्हणाले, सायझिंग व अन्य उद्योग यांचा सर्व्हे करण्यासाठी मोहीम राबविली जाईल.
प्रांताधिकारी पाटील म्हणाले, उद्योग चालवून कोणीही उपकार करत नाहीत. त्यामुळे प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कारवाई करावी.
...तर ‘एव्हीएच’सारखी अवस्था होईल
प्रदूषणकारी घटक बाहेर सोडणाऱ्या कोणत्याही प्रकल्पांना परवाना देऊ नये. क्षमतेपेक्षा अधिक गाळप केल्यानंतर बाहेर पडणारे दूषित पाणी नदीत किंवा ओढ्यावर कारखाने सोडत असतात. त्यामुळे गाळप परवाना देतानाच प्रक्रिया प्रकल्प सक्षम आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी. अन्यथा आता लोक शांत बसणार नाहीत. ‘एव्हीएच’सारखी अवस्था करतील, असा इशारा गायकवाड यांनी दिला.