प्रकाश आवाडेंचा भाजप प्रवेश सोडून बोला, शेट्टी खोटे बोलत नाहीत; भाजप प्रदेश उपाध्यक्षांच्या विधानाने चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 01:37 PM2023-07-01T13:37:54+5:302023-07-01T13:50:39+5:30
आमदार आवाडेंचा पक्षप्रवेश राजकीय गटबाजीतून खोळंबला
अतुल आंबी
इचलकरंजी : विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यापासून विशेष चर्चेत न राहणाऱ्या भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत चांगलीच राजकीय टिप्पणी केली. त्यामध्ये आवाडेंचा भाजप प्रवेश सोडून बोला, शेट्टी खोटे बोलत नाहीत, मानेंचेही योगदान आहेच की, अशी विधाने केल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, त्यांच्या प्रत्येक टिप्पणीचे वेगवेगळे अर्थ लावत चर्चेला उधाण आले होते. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात किमान एक लोकसभेची जागा कमळ चिन्हावर लढवावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षांतील विकासकामांचा आढावा घेण्यासाठीच्या पत्रकार बैठकीत सुरुवातीलाच हाळवणकर यांनी आमदार प्रकाश आवाडे यांचा भाजप प्रवेश सोडून अन्य कोणताही प्रश्न विचारा, असे पत्रकारांना सांगितले. त्यावर पत्रकारांनी तुमच्याकडूनच राहिले आहे, असे समजते. त्यामुळे मग प्रश्न विचारायचा कोणाला, असे म्हणताच हाळवणकर यांनी मिश्कील हास्य करून त्यावर बोलणे टाळले. यापूर्वीच्या एका जाहीर कार्यक्रमात आवाडे यांनी आम्ही तयार आहे, तिकडूनच थांबले आहे, असे म्हणत तुम्ही पुढाकार घेऊन आमचं जुळवून द्या, असे जाहीर वक्तव्य केले होते. त्यामुळे हा प्रश्न येणार, हे अपेक्षित धरूनच हाळवणकरांनी पत्रकार बैठकीची सुरुवातच या प्रश्नाला बगल देत केली. त्यामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी राहणार, याबाबत दोन्ही गटाचे कार्यकर्ते बुचकळ्यात आहेत.
लोकसभा मतदारसंघातील कामात खासदार धैर्यशील माने यांच्या योगदानाबाबत विचारल्यावर हाळवणकरांनी ते खासदार आहेत. म्हणजे त्यांचे योगदान आहेच की, असे त्रोटक उत्तर दिले. त्याचबरोबर रुकडी रेल्वे उड्डाणपुलासाठी नेमके कोणाचे योगदान, यावर उत्तर देताना ते म्हणाले, राजू शेट्टी खोटे बोलत नाहीत. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले होते. त्यावेळी मीही सोबत होतो. त्यामुळे या कामात त्यांचेही योगदान आहे. या पुलाचे उद्घाटन खूपच घाईत झाले. मंत्री गडकरी यांनी आॅनलाइन उद्घाटन केले असताना पुन्हा आततायीपणा करण्यापेक्षा योगदान असणाऱ्या सर्वांना बोलावून रीतसर उद्घाटन करणे योग्य ठरले असते, असे स्पष्टपणे सांगितले.
एकूणच त्यांच्या राजकीय उत्तरातून शहरात समाजमाध्यमांवर जोरदार चर्चा रंगली. भाजपची शेट्टी यांच्याशी जवळीक किंवा हाळवणकर लोकसभेला उभारतील. तसेच आमदार आवाडेंचा पक्षप्रवेश राजकीय गटबाजीतून खोळंबला आहे. खासदार माने व त्यांचा गट मुख्यमंत्र्यांच्या अवतीभवती आहे. त्यातून स्थानिक भाजपला बाजूला ठेवून विकासकामांचे नियोजन होते, अशा चर्चांना ऊत आला. त्यामुळे शहरासह मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळण्यास सुरुवात झाली आहे.