आवाडेंकडून ‘आयजीएम’मधील स्वच्छतेसंदर्भात खडे बोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:27 AM2021-02-11T04:27:40+5:302021-02-11T04:27:40+5:30
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयास आमदार प्रकाश आवाडे यांनी बुधवारी अचानक भेट दिली. तेथे कचऱ्याचे ढीग, धुळीचे साम्राज्य आढळले. ...
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयास आमदार प्रकाश आवाडे यांनी बुधवारी अचानक भेट दिली. तेथे कचऱ्याचे ढीग, धुळीचे साम्राज्य आढळले. याबाबत आयजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकुमार शेट्ये यांच्याकडून माहिती घेतली असता, कर्मचारी नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे मान्य केले. त्यावर आमदार आवाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी व नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांची कानउघाडणी करून तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबत दोन दिवसात मार्ग न काढल्यास आमच्या पद्धतीने यंत्रणा राबवू, असा इशारा दिला.
रुग्णालयामध्ये स्वच्छता होत नाही, अशी तक्रार आवाडे यांच्याकडे आली होती. त्यामुळे त्यांनी बुधवारी आयजीएम रुग्णालयास भेट दिली. ते भेट देणार असल्याची कुणकुण लागताच अनेक ठिकाणी स्वच्छता केल्याचे निदर्शनास आले, तर अनेक महत्त्वाच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग व धूळ दिसून आली.
त्यावर आवाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक माळी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत, रुग्णालयामध्ये तत्काळ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना केल्या. तसेच नगरपालिकेने कोरोनाच्या काळात दहा स्वच्छता कर्मचारी आयजीएम रुग्णालयास दिले होते, ते पुन्हा नगरपालिकेने का काढून घेतले, याबाबत माहिती घेतली. त्यावर आज, गुरुवारपासून रुग्णालयात दहा स्वच्छता कर्मचारी पाठविण्याचे आरोग्य अधिकारी संगेवार यांनी मान्य केले.
फोटो ओळी
१००२२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयास आमदार प्रकाश आवाडे यांनी भेट देऊन स्वच्छतेविषयी कडक सूचना दिल्या.
छाया-उत्तम पाटील