लोकसभा जागा वाटपाची चर्चा दिल्ली अधिवेशनानंतर : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:52 PM2018-07-28T12:52:30+5:302018-07-28T12:56:52+5:30
लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्यावर राहूल गांधी आणि माझ्यामध्ये झालेल्या चर्चेत शिक्कामोर्तब झाले आहे. आता जागा वाटपाबाबतची चर्चा दिल्लीतील अधिवेशन संपल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवार यांनी दिली.
कोल्हापूर : लोकसभेसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होण्यावर राहूल गांधी आणि माझ्यामध्ये झालेल्या चर्चेत शिक्कामोर्तब झाले आहे. आता जागा वाटपाबाबतची चर्चा दिल्लीतील अधिवेशन संपल्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या शरद पवारयांनी दिली.
पवार म्हणाले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी आणि माझी तीन वेळा बैठक झाली. त्यातून महाराष्ट्रात आघाडी करण्याबाबत एकमत झाले. मात्र जागा वाटपाबाबत अजून चर्चा झाली नाही. ही चर्चा दिल्लीतील अधिवेशन झाल्यानंतर सुरू होईल.
यामध्ये कॉंग्रेसकडून अशोक गेहलोत, अशोक चव्हाण तर राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हे चर्चेमध्ये भाग घेतील. अगदीच यातून काही जागांबाबत मतभेद निर्माण झालेच तर ते आमच्या वरिष्ठांच्या पातळीवर सोडवले जातील असेही यावेळी पवार यांनी स्पष्ट केले.
देशपातळीवर भाजपच्याविरोधात एकच आघाडी करण्यासाठी खूप मर्यादा असल्याचे सांगून पवार म्हणाले, माझी याबाबतची सुचना वेगळी आहे. कारण देशपातळीवर आघाडी केल्यानंतर आमच्या पक्षाने ताकद नसलेल्या पंजाबमध्ये जागा मागणे उचित होत नाही. परंतू तशा मागण्या होतात आणि मग चर्चा पुढे जात नाही. त्यापेक्षा त्या त्या राज्यातील कॉंग्रेस आणि प्रादेशिक पक्षांनी एकत्र आल्यास प्रत्येक राज्यात एक मजबूत विरोधी आघाडी होईल असे माझे मत आहे.
नेता जाहीर करायला हरकत नाही
ज्या त्या पक्षाने निवडणुकीआधी आपला नेते जाहीर करणे यात गैर काहीही नाही. कॉंग्रेसने जर राहूल गांधीं आमचे नेते म्हटले किंवा समाजवादी पक्षाने अखिलेश यादव आमचे नेते आहेत असे म्हटले तर त्यात वावगे काही नाही. पंतप्रधानपदाचा नेता हा निवडणूक झाल्यानंतर ठरत असतो. तोपर्यंत पक्षांनी आपल्या नेत्यांची नावे घेणे गैर नाही असेही पवार म्हणाले.