पालिका राजकारणात नेत्यांवर राग
By admin | Published: December 31, 2014 12:24 AM2014-12-31T00:24:07+5:302014-12-31T00:27:54+5:30
सभापती निवडीकडे लक्ष : परमारपाठोपाठ पुरेकरांनी केले बंड
कोल्हापूर : केवळ आपल्या मागे-पुढे करणाऱ्यांना महानगरपालिकेतील पदे मिळत असल्याने सर्वसामान्य नगरसेवकांमध्ये नेत्यांविषयी प्रचंड नाराजी निर्माण झाली असून त्याचा उद्रेक मृदुला पुरेकर व प्रकाश नाईकनवरे यांच्या बंडातून स्पष्ट झाला.
गतवर्षी नगरसेवक रणजित परमार यांनी थेट माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर तोफ डागली होती. आता तर आघाडीच्या विरोधातच बंड करण्यात आल्यामुळे नाराजीची ही धग शेवटी-शेवटी वाढतच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या बंडाकडे साऱ्या शहराचे लक्ष लागले आहे.
मृदुला पुरेकर व प्रकाश नाईकनवरे यांनी आजच्या घडीला केलेल्या बंडाला शुक्रवारपर्यंत कसे आणि कितीजणांचे पाठबळ मिळते हा विषय औत्सुक्याचा असला तरी रणजित परमार, मृदुला पुरेकर, प्रकाश नाईकनवरे यांनी कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये नेत्यांच्या राजकारणाविषयी कमालीची नाराजी असल्याचे दाखवून देण्याचे धाडस दाखविले आहे.
कदाचित दोघांना जरी कोणाचा पाठिंबा मिळाला नाही तरी त्यांनी स्वत: निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार केला आहे. (प्रतिनिधी)
सतेज पाटील यांच्यावरच हल्लाबोल
जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील गटाचे असल्यानेच सतेज पाटील यांनी आपणाला डावलल्याचा आक्षेप परमार यांनी घेतला होता, तर पुरेकर यांनी अशाच प्रकारचा आक्षेप घेत सतेज पाटील यांच्यावरच आक्षेप घेतला आहे. हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या दबावापुढे झुकून आपणाला डावलले, असा आरोप त्यांनी काल केला. काही मोजक्या नगरसेवकांना पदाधिकारी होण्याचा मान नेत्यांनी मिळवून दिला आहे, असा समज नगरसेवकांचा झाला असल्याने नाराजीचा सूर वाढला आहे.
कायदेशीर अर्थ शोधण्यास सुरुवात
‘व्हीप’चा कायदेशीर अर्थ शोधण्यात येत आहे. काही उलटसुलट माहितीही पुढे आणली जात असून त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत. स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादीच्या आदिल फरास यांना मतदान करा, असा व्हीप त्या पक्षाच्या गटनेत्याला लागू करता येतो आणि तो बंधनकारक असतो परंतु काँग्रेसच्या गटनेत्याने तसा व्हीप काढला तरीही तो पाळलाच पाहिजे, असा काही नियम नसल्याचा दावा बंडखोरांकडून केला जात आहे.
थांबा,
पहा बंडखोरांचा पवित्रा
काल(सोमवार)रात्रीपासून बंडखोरी केलेल्या मृदुला पुरेकर व प्रकाश नाईकनवरे यांनी सदस्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. नाराजांना हेरून त्यांना काही आमिषे दाखविण्याचा प्रयोग केला जात आहे, परंतु पक्षीय पद्धत आणि पक्षादेश डावलून मतदान केले तर होणारी कारवाई याबाबत चाचपणी केली जात आहे. त्यामुळे सध्या तरी कोणी उघडपणे बोलायला तयार होत नाही.
पक्षाचा ‘व्हीप’ लागू
पुरेकर व नाईकनवरे यांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अधिक सावधपणा घेतला असून आज सायंकाळपर्यंत स्थायी व परिवहन समितीच्या सदस्यांना गटनेत्यांनी पक्षाचा व्हीप लागू केला आहे. आदिल फरास व अजित पवार यांनाच मतदान करावे, असे या व्हीपद्वारे बजावण्यात आले आहे.