तालमी पुन्हा ओस पडल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:20+5:302021-04-19T04:22:20+5:30
कोल्हापूर : एकेकाळी मल्लांच्या शड्डूंचा खणखणाट अन् हुंकार अशा ईर्ष्येच्या वातावरणात गंगावेश, मोतीबाग, काळाईमाम, शाहूपुरी, आदी तालमी मल्लांनी गजबजून ...
कोल्हापूर : एकेकाळी मल्लांच्या शड्डूंचा खणखणाट अन् हुंकार अशा ईर्ष्येच्या वातावरणात गंगावेश, मोतीबाग, काळाईमाम, शाहूपुरी, आदी तालमी मल्लांनी गजबजून गेल्या होत्या. मात्र, मागील वर्षापासून कोरोनाच्या कहरामुळे एकही कुस्ती स्पर्धा झाली नाही. त्यामुळे मल्लांना मिळणारे खुराकाचे पैसे अर्थात मानधन दानशूरांकडून आटले आहे. सलग दुसऱ्या वर्षी असा आघात झाल्यामुळे सुमारे तीन हजार मल्लांनी घरची वाट धरली आहे.
संस्थानकाळापासून फुटबाॅल, कुस्ती हे जणू कोल्हापूरकरांच्या रक्तातच भिनले आहे. मात्र, डिजिटलच्या युगात कुस्ती काही प्रमाणात मागे पडू लागली आहे. हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कुस्तीप्रेमींकडून मल्लांना यात्रा, जत्रा आणि साखर कारखान्यांकडून मानधनाच्या रूपाने मदतीचा हात दिला जातो. गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हा मदतीचा हात आखडला आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सुमारे तीन हजार मल्लांनी गावाकडची वाट धरली आहे.
मल्लांना महाराष्ट्र केसरीची आस
महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश आदी ठिकाणांहून अनेक मल्ल लाखो रुपये खर्च करून कोल्हापूरच्या नामांकित मोतीबाग, शाहूपुरी, गंगावेश, न्यू मोतीबाग, कळंब्याच्या राष्ट्रकुल, शिंगणापुरातील मुंडे आण्णांच्या तालमीत येतात. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी, महान भारत केसरी, अशा नावाजलेल्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व व त्या जोडीची ताकद कमावण्यासाठी या तालमीत मल्ल जिवाचे रान करून प्रवेश घेतात. मात्र, गेल्यावर्षीपासून मल्लांकरिता एकही स्पर्धा झालेली नाही. स्पर्धाच होत नसेल तर नुसता सराव करून काय करायचे, असाही प्रश्न मल्लांना पडत आहे. जे स्वप्न म्हणून बघितलेल्या महाराष्ट्र केसरीसारख्या स्पर्धांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे अनेक मल्लांनी आपल्या गावाकडची वाट धरली आहे.
खुराकचा खर्च असा,
लोणी, केळी, थंडाईसाठी बदाम, दोन वेळचा चिकू शेक, सफरचंद, अंडी, मांसाहार अशा प्रकारचा खुराक सर्वसाधारण ७० ते १२० किलो वजनाच्या खुल्या गटातील मल्लांना लागतो. याचा दिवसाचा खर्च काढला तर ८०० ते १००० रुपये मोजावे लागतात. हा खर्च हे मल्ल काही प्रमाणात कर्ज, आई-वडिलांकडून किंवा यात्रा, जत्रांतून मिळणाऱ्या बक्षीस, मानधनातून काढत होते. हे सर्व बंद असल्यामुळे कोठून खर्च करायचा, असा प्रश्न मल्लांना पडला आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्त्या विनाप्रेक्षक घ्या
प्रत्येक मल्लाचे स्वप्न असणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा यंदा तरी विनाप्रेक्षक घ्यावी. जे मल्ल पात्र होतील, त्यांची सर्व पद्धतीने आरोग्य चाचणी घ्यावी. त्यानंतरच विनाप्रेक्षक स्पर्धा महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने घ्यावी, अशी मागणी महाराष्ट्र कुस्ती मल्ल विद्याचे प्रवक्ते संग्राम कांबळे यांनी केली आहे.
कोट
एक मल्ल दोन प्रहराच्या अंग मेहनतीतून प्रत्येक अवयव आणि फुप्फुसांमध्ये भरपूर ऑक्सिजन शोषून घेतो. त्यांच्यामध्ये सर्वसामान्यांपेक्षा रोग प्रतिकार शक्ती अधिक तयार होते. आरोग्य तपासणीत हे तज्ज्ञांनाही कळू शकते. तरीसुद्धा कुस्तीचा सराव, स्पर्धा शासनाने बंद केल्या आहेत. मग आयपीएलसारख्या स्पर्धा , उत्तर प्रदेशातील मैदाने, परदेशातील कुस्तीपटूंचे दौरे कसे चालतात. - राम सारंग, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक, राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते