सीमा भागातील तालुक्यांचा कायापालट होणार
By Admin | Published: February 13, 2015 01:11 AM2015-02-13T01:11:57+5:302015-02-13T01:14:16+5:30
पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रकल्प : दोडामार्ग, सावंतवाडीचा विकास शक्य
नीलेश मोरजकर - बांदा -मोपा विमानतळामुळे महाराष्ट्र-गोवा या सीमा भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, पर्यायाने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांचा आणि परिसरातील गावांचा विकास होण्यास मदतच होणार आहे. या प्रकल्पामुळे या भागाचा कायापालट होईल, आणि परिसरात विकासाची गंगा येणार असल्यामुळे रोजगारवृध्दीही होईल. गोवा सरकारनेही या प्रकल्पाबाबत तेथील नागरिकांचीही मते जाणून घ्यावीत, अशी सीमा भागातील नागरिकांची मागणी आहे.
सीमेवरील हा पहिलाच आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या विकास आराखड्यात पेडणे, बांदा शहरांचा समावेश आहे. मोपा प्रकल्प हा बांदा शहरापासून केवळ ६ किलोमीटर अंतरावर आहे.
मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे सीमा भागाचा पर्यटन दृष्टिकोनातून विकास होणार आहे. या प्रकल्पाचा फायदा बांद्यातील व्यापारी पेठ व शहरातील पर्यटन स्थळांना होणार आहे.
गोवा राज्यात भाजपाची सत्ता असून बांदा शहरातही भाजपाची सत्ता आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर हे उत्तर गोव्यातील असून त्यांचे बांदा शहराशी नाते आहे. बांदा येथील लोकोत्सव कार्यक्रमात प्रा. पार्सेकर यांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. यावेळी मोपा विमानतळ प्रकल्पाचा बांदावासीयांनी फायदा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले होते.
त्यामुळे या प्रकल्पाबाबत त्यांच्याशी चर्चा करून या प्रकल्पात सीमावासीयांना देखील सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बांदा गावच्या सरपंच प्रियांका नाईक यांनी सांगितले.
लोकमत
विशेष-२