तळवडे दरोडा प्रकरण : जमीन खरेदी-विक्री एजंट पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 07:23 PM2021-11-25T19:23:52+5:302021-11-25T19:26:38+5:30
शाहूवाडी तालुक्यातील आंबा-तळवडे येथील बांधकाम व्यावसायिक शांतय्या स्वामी यांच्या घरावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी १० लाखांची लुट केली.
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील आंबा - तळवडे येथील बांधकाम व्यावसायिक शांतय्या स्वामी यांच्या घरावर दरोडा टाकत दरोडेखोरांनी १० लाखांची लुट केली. स्वामी यांनी चार महिन्यापूर्वी मोठ्या किंमतीला जमिनीची विक्री केली होती. यांच्याकडे पैसे असल्याचे फक्त जमीन खरेदी विक्री करणाऱ्या एजंटाना माहित होते. त्यामुळे या व्यवहारातील कमिशन न मिळालेल्या एजंटानेच दरोडेखोरांना टीप दिली असल्याची घटनास्थळी चर्चा होती. स्थानिक व्यक्तीने ही माहिती दिल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितल्याने या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे.
२४ नोव्हेबर रोजी कर्नाटकातील विजापूर येथे स्वामी यांच्या पुतण्याचे लग्न होते. घरी लग्नकार्य असल्याने स्वामी पैसे घरी आणून ठेवणार याची पक्की माहिती माहितीदाराने दरोडेखोरांना दिली असण्याची शक्यता आहे. त्याच रात्री दरोडेखोरांनी वेळ साधून दरोडा टाकून ही रक्कम लंपास केली.
शाहूवाडी तालुक्यात जमिनीची खरेदी विक्री जोरात सुरु आहे. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गालगतच्या जमिनीला चांगला दर येत आहे . आंबा - तळवडे येथे जमिनीचे दर तेजीत आहेत . त्यामुळे या व्यवसायात न पैसे गुंतविता एजंट मालामाल होत आहेत. एजंटाची साखळी आहे. काही एजंट शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे स्वामीच्या जमिन खरेदी विक्री व्यवहारात दुःखावलेल्या एजंट अथवा जमिनीसाठी पार्टी आणणाऱ्या एजंटाची पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे.