चित्रपट महामंडळाच्या सभेत ‘तमाशा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:41 AM2019-12-16T00:41:14+5:302019-12-16T00:41:40+5:30
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकमेकांवर धावून जाणे, निकालाची प्रत भिरकावणे, दमदाटी, दडपशाही, घेराव, ...
कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकमेकांवर धावून जाणे, निकालाची प्रत भिरकावणे, दमदाटी, दडपशाही, घेराव, प्रचंड वादावादीच्या वातावरणात आणि एकाही विकासकामाच्या मुद्द्यावर चर्चा न होता ‘सर्व विषय मंजूर’ म्हणत रविवारी गुंडाळण्यात आली. माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेल्याचे सभासदत्व आणि बेकायदेशीर व अपूर्ण अहवाल रद्द करा, या मागणीवरून सभेत ‘न भूतो, न भविष्यती’ असा गोंधळ झाला. यावेळी विरोधी गटाने अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या राजीनाम्याची मागणी केली व समांतर सभा घेतली.
भवनमध्ये झाली. यावेळी उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह सुशांत शेलार, खजिनदार संजय ठुबे, संचालक वर्षा उसगावकर, सतीश बीडकर, सतीश रणदिवे, पितांबर कांबळे, विजय खोचीकर, शरद चव्हाण, मधुकर देशपांडे, निकिता मोघे उपस्थित होत्या.
अध्यक्षांचे प्रास्ताविक सुरू असतानाच मिलिंद अष्टेकर यांनी त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणाऱ्या अभिनेत्री छाया सांगावकर, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर यांच्या ‘सभासदत्व रद्द’ची मागणी केली. ती सभासदांनी लावून धरल्याने गोंधळास सुरुवात झाली. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी सुरुवातीलाच ‘अशा पद्धतीने वागणार असाल तर सभा घेणार नाही,’ असे सुनावले. कार्यवाह सुशांत शेलार यांनी ‘सभेच्या प्रक्रियेनुसार जाऊ या; अध्यक्षांना प्रास्ताविक करू द्या,’ असे आवाहन केले. अखेर अर्ध्या तासाने अध्यक्षांनी प्रास्ताविक सुरू केले. मात्र प्रास्ताविक संपल्यानंतर लगेच त्यांनी लंच टाइम जाहीर केला आणि ते व्यासपीठावरून खाली आले. हे पाहताच संतप्त सभासदांनी अध्यक्षांना घेराव घातला मिलिंद अष्टेकर हे अध्यक्षांच्या समोरच आडवे झाले व त्यांना पुन्हा व्यासपीठावर यायला भाग पाडले.
त्यानंतर अध्यक्षांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून महामंडळाचे वकील सविस्तर बोलतील, असे सांगितले. अॅड. प्रशांत पाटील यांनी सभासदत्व रद्दचे प्रकरण न्यायालयात असून त्यावर निर्णय घेता येणार नाही, असे सांगितले. यावर संचालक बाळा जाधव यांनी मागच्या सर्वसाधारण सभेत सभासदत्व रद्दचा निर्णय झाला होता. पुन्हा सभासद व्हायचे असेल तर न्यायालय किंवा सभेत ठराव करावा लागतो, असे सांगण्यात आले होते. महामंडळाला याबाबत निर्णय घेता येत नसेल तर कोणत्या अधिकारात पुन्हा सभासदत्व दिले, अशी विचारणा केली. या विषयावरून पुन्हा प्रकरण पेटले. या गोंधळातच सुशांत शेलार यांनी अहवाल वाचन सुरू केल्याने सभासदांनी थेट व्यासपीठावर येऊन माईक बंद पाडला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला. अध्यक्ष दादच देत नाहीत म्हटल्यावर विजय पाटकर यांनी अध्यक्षांच्या राजीनाम्याची व वर्षा उसगावकर यांना अध्यक्षपद देण्याची मागणी केली. ती सगळ्यांनी उचलून धरली. अखेर जेवणासाठी सभा थांबवण्यात आली.
दुपारी दोन वाजून २२ मिनिटांनी पुन्हा सभा सुरू झाली. यावेळी शेलार यांनी सर्व सभासदांना हे प्रकरण कळावे यासाठी अष्टेकर व सांगावकर या दोघांनाही बोलण्यासाठी १०-१० मिनिटांचा वेळ द्यावा, असा प्रस्ताव मांडला. याला सभासदांनी जोरदार विरोध केला. ‘गेली सहा वर्षे हे प्रकरण सुरू आहे. आता पुन्हा सगळ्यांसमोर मांडा म्हणताय, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. एका व्यक्तीसाठी सगळ्या सभासदांशी तुम्ही का भांडताय?’ अशी विचारणा करण्यात आली. त्यावर शेलार यांनी ‘हात उंचावून सभासदत्वावर मत घेऊ या,’ असे सांगितले. यालाही सभासदांनी विरोध केला. ‘न्यायालयाने अष्टेकर यांना निर्दोष मुक्त केले आहे. इथे न्यायालय मांडणारे तुम्ही कोण?’ असे म्हणत जाधव यांनी शेलार यांच्या अंगावर निकाल फेकला. हा गोंधळ सुरू असतानाच शेलार यांनी इतिवृत्त वाचायला सुरुवात केली. ‘सगळे विषय मंजूर’ म्हणत सभा पावणेतीन वाजता गुंडाळत राष्ट्रगीत सुरू करण्यात आले.
आम्हालाही बोलू द्या
या सभेला मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद असे महाराष्ट्रातून सभासद आले होते. मात्र एकाच विषयावरून सभा पुढे सरकत नाहीय म्हटल्यावर या सभासदांनी आम्हालाही बोलू द्या, आमचे विषय मांडू द्या, चित्रपटसृष्टीचे, आमचे प्रश्न कोणी विचारात घेणार की नाही? अशी मागणी केली.
तुमच्याकडूनच शिकलोय..
यावेळी मेघराज राजेभोसले गोंधळावरून सभासदांना सुनावत असताना विजय पाटकर यांनी ‘आम्ही तुमच्याकडूनच हे सगळं शिकलोय,’ अशी कोपरखळी मारली. एवढ्या तणावातही यावरून सभागृहात हशा पिकला.
जुन्या कार्यालयाची जागा विकू देणार नाही
कोल्हापूर : चित्रपट महामंडळाने काढलेल्या वार्षिक अहवालात अनेक गंभीर त्रुटी असून, हा अहवालच बेकायदेशीर आहे. या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार करण्याचा ठराव अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या समांतर सभेत झाला. तसेच कोल्हापुरातील जुन्या कार्यालयाची जागा विकू देणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
महामंडळाच्या सत्तारूढ गटाने सभा गुंडाळल्यानंतर तेथेच विरोधी गटाने समांतर सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर संचालक वर्षा उसगावकर, सतीश रणदिवे, सतीश बिडकर, बाळा जाधव उपस्थित होते.