तांब्याचीवाडी, भटवाडी होणार प्रकाशमान
By admin | Published: June 25, 2016 12:05 AM2016-06-25T00:05:20+5:302016-06-25T00:47:02+5:30
‘लोकमत’चा पुढाकार : स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर या गावांमध्ये पहिल्यांदा वीजपुरवठा; प्रकाश आबिटकर यांचे प्रयत्न
शिवाजी सावंत-- गारगोटी भुदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी आणि भटवाडी या गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतर पहिल्यांदा वीजपुरवठा होणार असल्याने या दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. ही गावे प्रकाशमय होण्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रयत्न केले आहेत.तालुक्याच्या पश्चिम टोकाला शेवटची असणारी ही दोन गावे एरवी कोणाच्याही खीजगणतीत नसतात. मतदान कमी असल्याने केवळ निवडणुका जवळ आल्या की आश्वासने देऊन उमेदवार पसार
झाले की पुन्हा निवडणूक आल्यानंतर हजर होतात. उमेदवाराने आश्वासन दिले की, तेथील भोळीभाबडी जनता गावात वीज येणार या आशेने एकटाकी मतदान करतात. उमेदवार निवडून आला की पुन्हा त्याला या मतदारांची आठवण राहत नाही, अशा परिस्थितीत या गावातील ग्रामस्थांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता. देश स्वतंत्र होऊन ६९ वर्षे पूर्ण झाली आहेत, तरी ही गावे अंधारात होती़. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते.गत विधानसभा निवडणुकीपूर्वी विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या यात्रेची सुरुवात झाली. ही यात्रा मतदारसंघात फिरत फिरत या गावांमध्ये आल्यानंतर एका शाळकरी विद्यार्थ्याने आमदार आबिटकरांच्या हाताला धरून म्हणाला ‘साहेब, आम्हालाही शाळा शिकायची आहे. आमच्याकडे लक्ष देता का?’ हे वाक्य ऐकल्यावर आमदार आबिटकरांच्या अंगावर काटा उभा राहिला आणि त्या मुलांची आगतिकता पाहून डोळ्यांत पाणी तरळले. त्यांनी मनाचा निश्चय केला की, आमदार होऊ अगर ना होऊ, पण पदाच्या पलीकडे जाऊन या गावांना वीजपुरवठा करण्यासाठी जिवाचे रान करायचे; पण वीज मिळवून द्यायची.यानंतर सुदैवाने ते विक्रमी मतांनी विजयी झाले. त्यांना ती मुले सदोदित नजरेस दिसत होती. त्यांनी महाराष्ट्र शासन आणि महावितरण कंपनीच्या माध्यमातून ६९ लाख रुपये खर्चून या दोन्ही ठिकाणी वीजपुरवठा पोहोचविण्यात यश मिळविले. ही घटना म्हणजे खऱ्या अर्थाने ही दोन गावे ‘प्रकाशमान’ झाली आहेत, ही वचनपूर्तीची साक्ष देत आहेत.
विद्यार्थ्यांसाठी अग्रक्रमाने काम पूर्ण
प्रकाश आबिटकर म्हणाले, राजकारणात उलथापालथी होत असतातच; पण समाजाचे प्रतिनिधित्व करीत असताना काही रचनात्मक काम करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याच्या सत्तरीत ही गावे अंधारात ठेवून आपण नेमका कोणता विकास साधला आहे? या प्रश्नाचे उत्तर सर्व राजकीय पक्षांना भविष्यात द्यावे लागले असते. याशिवाय त्या निरागस विद्यार्थ्यांचा चेहरा सदैव माझ्या डोळ्यांसमोर उभा राहत होता, म्हणून मी अग्रक्रमाने हे काम पूर्ण करण्याची काळजी घेतली.