बटालियनच्या केंद्रासाठी तमदलगेकरांचा पुढाकार

By admin | Published: January 28, 2016 11:47 PM2016-01-28T23:47:56+5:302016-01-29T00:37:35+5:30

जागेचा प्रश्न : बांधकामास परवानगी देण्याचा ठराव

Tamlagekkar's initiative for battalion center | बटालियनच्या केंद्रासाठी तमदलगेकरांचा पुढाकार

बटालियनच्या केंद्रासाठी तमदलगेकरांचा पुढाकार

Next

जयसिंगपूर : वनसंज्ञा रद्द करून भारत बटालियनला बांधकाम करण्याची परवानगी द्यावी, असा ठराव तमदलगे (ता. शिरोळ) येथे २६ जानेवारीच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. ‘भारत राखीव बटालियन-३’च्या नावावर या ठिकाणी जमीन असून, वनसंज्ञा असे आरक्षण असल्यामुळे बांधकामास अडचणी येत होत्या. तमदलगेकरांनी पुढाकार घेऊन सभेत ठराव केल्यामुळे बटालियनच्या जागेचा प्रश्न निकालात निघण्याच्या मार्गावर असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात हा प्रश्न आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याकरिता ‘भारत राखीव बटालियन-३’ची शासनाने निर्मिती केली. परंतु, या बटालियनचा गेल्या पाच वर्षांपासून जागेअभावी मुक्काम दौंड (पुणे) येथे आहे. दरम्यान, रेंदाळ (ता. हातकणंलगे) येथील जागा मंजूर करण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र ते निष्फळ ठरले.
प्रारंभी मजले (ता. हातकगणंले) व तमदलगे (ता. शिरोळ) येथील जागा निश्चित करण्यात आली होती. सुमारे ४० हेक्टर जागा प्राप्त झाली. ही जागा सध्या ‘भारत राखीव बटालियन-३’च्या नावावर आहे. परंतु, मजले येथील जागा डोंगरमाथ्यावर व उतारावर असून, तमदलगे जागेत वनसंज्ञा लागू असल्याने त्यावर बांधकाम सुरू करण्यास अडचणी येत होत्या.
मात्र, ग्रामसभेत तमदलगे गावाने भारत राखीव बटालियन क्र-३ च्या कोल्हापूर गट उभारणी करता देण्यात आलेल्या जमिनीवर वन आरक्षण काढून बांधकामास परवानगी द्यावी, असा ठराव मंजूर केला आहे. हा ठराव जिल्हाधिकारी अमित सैनी यांना पाठविण्यात आला आहे. ठरावामध्ये म्हटले आहे की, येथील गट क्र. २८ मधील २० हेक्टर जमीन वनक्षेत्रात आहे. ही जागा समादेशक, भारत राखीव बटालियन क्र. ३ यांच्या नावे सातबारा पत्रकी नोंद आहे. ही जागा प्रयोजनाकरिता देण्यात आली होती. या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी वनविभागाकडून रीतसर परवानगी घेऊन बटालियन गट उभारणी करण्यासाठी जमिनीवरील वनआरक्षण काढून त्या ठिकाणी बांधकामास हरकत नसल्याचे नमूद केले आहे. (प्रतिनिधी)


२००७ सालापासून तमदलगे येथील जागा बटालियनच्या जागेवर असून, वनसंज्ञाच्या प्रश्नामुळे येथे बटालियन होण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, तमदलगे गावाने एक पाऊल पुढे येऊन बटालियनचे केंद्र उभारण्यासाठी ग्रामसभेत ठराव केला आहे. आता हा प्रश्न शासनाने लवकरात लवकर निकालात काढून या ठिकाणी बटालियन केंद्र स्थापन करावे.
- सपना कांबळे, सरपंच, तमदलगे

राज्य राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण तळासाठी राधानगरी ग्रामपंचायत देणार ६० एकर जमीन


दोन वर्षांपूर्वी हा प्रशिक्षण तळ मंजूर झाला आहे. यासाठी यापूर्वी तमदलगे, रेंदाळ व दिंडनेर्ली येथील जागा पाहण्यात आल्या. मात्र, स्थानिकांनी त्याला विरोध केल्याने त्या बारगळल्या. त्यामुळे हा तळ अहमदनगर जिल्ह्यात हलविण्याच्या हालचाली अधिकारी पातळीवर सुरू आहेत.
मध्यंतरी येथील सत्ताधारी आघाडीचे प्रमुख राजेंद्र भाटळे यांनी खासदार धनंजय महाडिक यांच्यामार्फत संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन जागा देण्याची तयारी दाखविली होती.
अन्यत्र जागा उपलब्ध होत नाही हे स्पष्ट झाल्यावर पुन्हा हा विषय चर्चेत आल्याने ग्रामपंचायतीने हा ठराव केला आहे.

राधानगरी : राधानगरी ग्रामपंचायतीने राज्य राखीव पोलीस दलाचा प्रशिक्षण तळ उभारण्यासाठी गायरानातील साठ एकर जागा देण्याची तयारी दाखविली आहे.
याबाबतचा ठराव मंगळवारच्या गावसभेत मंजूर केला आहे. सरपंच सुनीता अनंत गुरव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. यामुळे जागेअभावी जिल्ह्याबाहेर जाणारा हा प्रकल्प जिल्ह्यातच राहण्याची शक्यता वाढली आहे.

Web Title: Tamlagekkar's initiative for battalion center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.