‘तानाजी मालुसरे’ चित्रपटातून इतिहासाचा विपर्यास : श्रीमंत कोकाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:16 PM2019-11-26T12:16:03+5:302019-11-26T12:17:13+5:30
कोल्हापूर : ‘तानाजी मालुसरे’ चित्रपटातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केला आहे. ऐतिहासिक पुस्तकांमध्ये कोठेही नोंद नसणाऱ्या घटना चित्रपटातून दाखविण्याचा ...
कोल्हापूर : ‘तानाजी मालुसरे’ चित्रपटातून शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केला आहे. ऐतिहासिक पुस्तकांमध्ये कोठेही नोंद नसणाऱ्या घटना चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे वादग्रस्त प्रसंग वगळून चित्रपट प्रदर्शित करावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करू, असा इशारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
कोकाटे म्हणाले, राजकीय सत्तेबरोबरच सांस्कृतिक वाद व सत्त महत्त्वाची असते. सांस्कृतिक वाद समजला नाही तर जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होईल आणि चुकीचा इतिहास लिहिला जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक चित्रपटांतून महापुरुषांचे विडंबन केले जाते. महापुरुषांचे विडंबन होईल असे लिहिण्याचे अथवा प्रदर्शित करण्याचे अधिकार संविधानाने दिलेले नाहीत. तानाजी मालुसरे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चुकीचे दाखविण्यात आले आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा इतिहास जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्टÑीय स्वयंसेवक संघाकडून सांस्कृतिक राष्टÑवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही कोकाटे यांनी सांगितले. यावेळी अनिल म्हमाणे, कपिल राजहंस, विजय पाटील, दयानंद ठाणेकर, आदी उपस्थित होते.