‘तंटामुक्ती’मुळे पोलिसांवरील ताण कमी
By admin | Published: January 7, 2015 09:00 PM2015-01-07T21:00:34+5:302015-01-08T00:02:17+5:30
एस. चैतन्य : हेरवाड ग्रामपंचायतीस तंटामुक्तीचा धनादेश प्रदान
कुरुंदवाड : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून गावागावांतील तंटे मिटत असल्याने पोलीस, न्यायालयावरील ताण कमी झाला आहे. समितीने तंटामुक्ती मोहीम बक्षिसापुरते मर्यादित न ठेवता निरंतन चालू ठेवल्यास गावचा व पर्यायाने देशाच्या विकासाला हातभार लागणार आहे, असे प्रतिपादन इचलकरंजी विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी केले.
हेरवाड (ता. शिरोळ) गावाला तंटामुक्तीबद्दल शासनाचा धनादेश वाटपप्रसंगी येथील ग्रामपंचायतीसमोर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकला पाटील होत्या. प्रारंभी एस. चैतन्य यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा तंटामुक्तीचा आठ लाख ७५ हजारांचा बक्षिसाचा धनादेश व प्रशस्तिपत्र समिती अध्यक्ष सत्याप्पा बरगाले व सरपंच पाटील यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
यावेळी सरपंच पाटील म्हणाल्या, गेल्या अडीच वर्षांपासून सर्व सदस्यांसह ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करीत असल्याने गावचा विकास होत आहे.
तंटामुक्तीबरोबरच गावाने व्यसनमुक्तीची मोहीमही हाती घेतली असून, तंटामुक्तीच्या बक्षिसाचा विनियोग योग्यरितीने केला जाईल, असा विश्वासही त्यांनी दिला. पोलीस उपअधीक्षक दिलीप सोनवणे, तंटामुक्त अध्यक्ष सत्याप्पा बरगाले, पोलीस निरीक्षक डी. एस. हाके,
पं. स. सदस्या सुवर्णा अपराज, अॅड. देवराज मगदूम यांची भाषणे झाली.
यावेळी उपसरपंच जीवन कांबळे, दिलीप पाटील, गुलाब विजापुरे, बंडू पाटील, वैभव पाटील, रामगोंडा पाटील, राजू आलासे, प्रदीप पाटील, प्यारेलाल मकानदार, शंकर बरगाले, जयगोंडा पाटील, पिंटू हुक्कीरे, बाळाप्पा माळी, रावसाहेब पाटील, आदी उपस्थित होते. दामोदर सुतार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर ग्रामसेवक निर्मळे यांनी आभार मानले. (वार्ताहर)