तांत्रिक, प्रबोधनात्मक देखाव्यांची पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:34 AM2017-08-28T00:34:09+5:302017-08-28T00:34:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गणेशोत्सवाची धामधूम संपूर्ण शहरात सुरू आहे. मंदिरे, विद्युत रोषणाईसह आकर्षक गणेशमूर्ती पाहण्यासाठी खुल्या झाल्या असून, त्या पाहण्यासाठी गर्दी होत आहे. सजीव व तांत्रिक देखावे, मंडपातील अंतर्गत सजावटी करण्यासाठी कार्यकर्ते दिवस-रात्र राबत आहेत. बहुतांश देखावे हे गुरुवार-शुक्रवारपासून पाहण्यासाठी खुले होणार आहेत. शिवाजी उद्यमनगरात सुमारे ‘वीस फूट लांब हेलिकॉप्टरमधून सर्जिकल स्ट्राईक’, मंगळवार पेठेत ‘रुसली अंबाबाई’, ‘वैभववाडी रेल्वे प्रवास’; तर शिवाजी पेठ व रंकाळा टॉवरवर इतिहासाचा गजर देखाव्यातून केला जाणार आहे.
प्रिन्स क्लब साकारतेय ‘अंबाबाई रुसली अन्...’
कोल्हापूर : प्रबोधनात्मक आणि विडंबनात्मक देखावे करून नेहमी चर्चेत राहिलेल्या खासबागनजीकच्या प्रिन्स क्लबने यंदा ‘आई अंबाबाई रुसली अन्...’ हा देखावा केला असून, तो गर्दी खेचणारा ठरणार आहे. यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी साकारलेली १४ फूट उंच आई अंबाबाईची प्रतिकृती रस्त्यावरील प्रेक्षकांमधून सुमारे ६० फूट लांबपर्यंत चालत जाणार आहे. हे साºयांचे आकर्षण ठरणार आहे.
श्री अंबाबाई मंदिरात सद्य:स्थितीत सुरू असलेल्या वादाची देखाव्याला झालर देण्यात आली. या देखाव्यातून अनेकांचे वाभाडे काढण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे. विश्ोष म्हणजे, या मंडळाची कार्यकारिणी ही महिलांच्या हाती दिली असल्याने त्यांनीच हा विषय मांडला आहे. या देखाव्याचा प्रारंभ शुक्रवारी (दि. १ सप्टेंबर) होणार आहे.
मंगळवार पेठेत ‘कोल्हापूर-वैभववाडी’चा रेल्वे प्रवास
कोल्हापूर : समाजप्रबोधनपर देखावे सादर करण्याची परंपरा असलेल्या मंगळवार पेठेतील श्री तुकाराम माळी तालीम मंडळातर्फे या वर्षी ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वे प्रवासाचा देखावा सादर केला जाणार आहे.
याबाबत मंडळाचे खजिनदार किरण अतिग्रे यांनी सांगितले की, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गाचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. या मार्गाचे महत्त्व, त्याचा कोल्हापूर आणि कोकणला व्यापार, सामाजिक, आदी क्षेत्रांच्या अनुषंगाने होणारा फायदा याची माहिती देण्याच्या उद्देशाने या वर्षी मंडळातर्फे ‘कोल्हापूर-वैभववाडी’ रेल्वेमार्गाचा देखावा साकारण्यात येणार आहे. यात तालमीजवळील रस्त्याच्या फूटपाथवर रेल्वेमार्ग, कोल्हापूर व वैभववाडी रेल्वेस्थानक, आदी उभारण्यात येईल. या मार्गावरून रेल्वे फिरविण्यात येईल. या रेल्वेत लहान मुलांना बसवून फिरविण्यात येणार आहे. दि. २ सप्टेंबरपासून हा देखावा खुला करण्यात येईल.
‘दिलबहार’चे ‘शिवकालीन मंदिर’ सर्वांसाठी खुले
कोल्हापूर : रविवार पेठेतील दिलबहार तालीम मंडळाने यंदा मध्य प्रदेशातील शिवकालीन मंदिराची प्रतिकृती साकारली असून, ती पहिल्या दिवसापासून सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.
मंडळाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात ‘दख्खनचा राजा’ रूपातील श्री गणेशमूर्तीची राजदरबारामध्ये प्रतिष्ठापना केली आहे. सुमारे २४०० स्क्वेअर फुटांत मध्यप्रदेशातील शिवकालीन मंदिराची कलात्मक प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यासाठी छत्रपती शिवाजी स्टेडियमनजीक विस्तीर्ण जागी सुमारे २४०० स्वेअर फुटांच्या जागेत मध्यप्रदेशातील पाच शिखरांचे प्राचीन शिवमंदिर साकारले आहे. त्यात राजदरबार उभारण्यात आला आहे.
यात सभोवतालचे सुशोभीकरण केले आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील व परिसरातील चार तीर्थक्षेत्रांचे सादरीकरण केले आहे. औदुंबर येथील श्रीदत्त दैवत, आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा यांचे माहात्म्य, वाळवा तालुक्यातील बहे येथील श्रीक्षेत्र नृसिंहपूर येथील श्री नृसिंह देवाचा संक्षिप्त परिचय, गडहिंग्लज येथील श्री काळभैरव दैवत या चार जागृत देवतांबद्दल परिचय राजदरबारात करून दिला जाणार आहे.
यु. के. बॉईज रंकाळा टॉवरवर साकारणार शिवाजी चौक
कोल्हापूर : कोल्हापुरातील रंकाळा टॉवर येथील कै. उमेश कांदेकर युवा मंचने (यु.के.बॉईज) यंदाच्या गणेशोत्सवात ‘समाजकारण व राजकारणाचा केंद्रबिंदू शिवाजी चौक’ असा सजीव देखावा तर ताराबाई रोडवरील नंदी तरुण मंडळाने ‘व्यसनाधीन तरुणाई’वर प्रकाशझोत टाकत तांत्रिक देखावा साकारला आहे.
विशेष म्हणजे, नुकत्याच झालेल्या आंबोली (जि. सिंधुदुर्ग) घटनेतील दोन मद्यपि तरुणांचा गेलेला जीव या तांत्रिक देखाव्यासह ब्ल्यू व्हेल, अमली पदार्थांच्या सेवनातून बिघडत चाललेली तरुणाई दाखविण्यात येणार आहे.
रंकाळा टॉवर येथील कांदेकर युवा मंच सात वर्षांपासून ऐतिहासिक सजीव देखावा करत आहे. यंदा शिवाजी चौकातील समाजकारण आणि राजकारणाचा केंद्रबिंदू शिवाजी चौक सजीव देखावा करणार आहेत. यामध्ये ३५ कलाकारांचा ताफा आहे. या चौकातील दिवसभराच्या हालचाली टिपून त्यांचा सजीव देखावा मांडण्यात येणार आहे. त्यासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. शिवाजी चौकातील हुबेहूब शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येत आहे तसेच त्याचा आजूबाजूचा परिसरही साकारण्यात येणार आहे. सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा करण्यापासून ते पुतळ्यासमोर करण्यात येणाºया आंदोलनाचे दर्शन या देखाव्यांतून मांडण्यात येणार आहे. या सजीव देखाव्यांचे गुरुवारी (दि. ३१) पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचा मंडळाचा मानस आहे.
सध्याची तरुणाई व्यसनाधीनने पोखरली आहे. ड्रग्स, कोकीन,
गांजा, हेरॉईन या अंमली पदार्थामुळे तरुण लयाला गेले आहेत तसेच हुक्का पार्टी, रेव्ह पार्टी आणि
चिल्लर पार्टी आदी प्रश्नांवर ताराबाई रोड, रंकाळा चौपाटीजवळील
नंदी तरुण मंडळाने तांत्रिक देखाव्यांतून प्रकाशझोत टाकला आहे.
यापूर्वी मंडळाने ‘पर्यावरण वाचवा’ यासह ‘बेटी बचाओ, देश बचाओ’ अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवर तांत्रिक देखावे केले आहे. यंदाही आंबोलीतील घटनेतील प्रसंग या तांत्रिक देखाव्यांतून दाखविण्यात येणार आहे.
नंदी तरुण मंडळाचे २१ सदस्य स्ववर्गणीतून गणेशोत्सव साजरा करतात. यापूर्वी तांत्रिक देखाव्यांतून समाजातील विविध समस्या यावर प्रकाशझोत टाकला आहे.
‘जय शिवराय’ चे सर्जिकल स्ट्राईक
कोल्हापूर : शिवाजी उद्यमनगरातील जय शिवराय मित्रमंडळाने यंदा भारत-पाकिस्तान संघर्षावर आधारित ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा तांत्रिक देखावा साकारला आहे. वीस फूट लांबीच्या हेलिकॉप्टरमधून स्वत: गणराया दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत असल्याचा देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा उद्या(मंगळवार)पासून भक्तांसाठी खुला होणार आहे.
या मंडळाने २० फूट लांबीचे अत्याधुनिक सुसज्ज हेलिकॉप्टर तयार केले आहे. ही भारतीय वायुदलातील लढाऊ हेलिकॉप्टरची प्रतिकृती आहे. ४० फूट उड्डाण करणाºया या हेलिकॉप्टरमधून स्वत: गणराया हातात मशीनगन घेऊन देखाव्यात साकारण्यात आलेल्या पाकव्याप्त काश्मीर भागात उतरणार आहेत. तेथे असणाºया पाकिस्तानी अतिरेक्यांचा खात्मा गणराया करत आहेत असा हा देखावा मंगळवारपासून सर्वांसाठी खुला करण्यात येणार आहे.
या देखाव्यासाठी तांत्रिक सहाय्य सागर जाधव, प्रशांत जाधव, रवींद्र सुतार, महेश बुधले, पांडुरंग पाटील, प्रताप देसाई यांनी केले आहे.