केआयटीमध्ये शनिवारपासून तांत्रिक महोत्सव

By admin | Published: September 30, 2015 01:13 AM2015-09-30T01:13:37+5:302015-09-30T01:15:08+5:30

‘पायोनिअर २०१५’ : देशभरातील २५०० विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग

Tantric Festival from KIT Saturday | केआयटीमध्ये शनिवारपासून तांत्रिक महोत्सव

केआयटीमध्ये शनिवारपासून तांत्रिक महोत्सव

Next

कोल्हापूर : अभियांत्रिकीविषयक शैक्षणिक तसेच अन्य व्यक्तिमत्त्व विकासाच्यादृष्टीने आवश्यक कौशल्य विकासासाठी केआयटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगतर्फे ‘पायोनिअर’ ही राष्ट्रीय तांत्रिक स्पर्धा घेतली जाते. यावर्षी शनिवारी (दि. ३ आॅक्टोबर) व रविवारी (दि. ४) ‘पायोनिअर २०१५’ तांत्रिक स्पर्धा व महोत्सव होणार आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी व पायोनिअरचे समन्वयक हर्षद ठाकूर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कार्जिन्नी म्हणाले, केआयटीतर्फे १९९३ पासून दरवर्षी ‘पायोनिअर’ आयोजित केले जाते. यंदा स्पर्धेचे २३ वे पर्व आहे. यात आयआयटी मुंबई, हैदराबाद, एनआयटी सुरत, कर्नाटक अशा विविध संस्थांतील सुमारे दोन हजार ५०० स्पर्धक सहभागी होतील. यातील दोन हजारजणांनी नोंदणी केली आहे. पायोनिअरचे उद्घाटन शनिवारी सकाळी दहा वाजता रायपूरच्या स्वामी विवेकानंद टेक्निकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. मुकेशकुमार यांच्या हस्ते, हरबिंजर संस्थेचे प्रबंधक निवेल पोस्टवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. रविवारी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी विद्यापीठाचे बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे, बारामती अ‍ॅग्रोचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर किशोर भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये समारोप व बक्षीस वितरण होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दीड लाख रुपयांची रोख बक्षिसे, प्रमाणपत्रे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.
समन्वयक ठाकूर म्हणाले, दोन दिवसीय या तांत्रिक महोत्सवात संशोधन पेपर सादरीकरणाची ‘अभिव्यक्ती’, भित्तीचित्रे सादरीकरणाची ‘प्रदर्शिनी’ स्पर्धा होईल. तसेच मेकॅनिकल, प्रोडक्शन, सिव्हील, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, सीएसई, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि ईअ‍ॅण्डटीसी अशा विभागवार १९ हून अधिक स्पर्धा होणार आहेत. महोत्सवात ‘सुभाषित’ व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या अंतर्गत शनिवारी परसिस्टंस् कंपनीचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे हे ‘स्टार्टअप इंडिया’बाबत तसेच रविवारी सिंधुदुर्गच्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे प्रतिनिधी डॉ. प्रसाद देवधर हे ‘शाश्वत ग्रामविकास’ विषयावर मार्गदर्शन करतील. यंदा पाहिल्यांदाच पायोनिअरसाठी शुभंकर म्हणून ‘अभियांत्रिकी क्रोकोडाइल’ तयार केला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ‘आॅरा क्लब’ने शुभंकर साकारला आहे. पत्रकार परिषदेस उपप्राचार्य डॉ. मनोज मुजुमदार, अनुप कुलकर्णी, प्रमोद पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)


स्पर्धेचे स्वरूप असे...
चाणाक्ष, एक्सटेम्पोर, क्रॉक्रिट क्युब, रामराज्य, सी प्रोगॅ्रमिंग, व्हर्ब-ओ-वॉर, किल्पटीव्हिटी, सोशियाटेक, दृश्यम, फायनल डेस्टिनेशन, ब्रीज मॉडेलिंग, टेक्नोगिक, जावा, डेसिफर, रोबोनियर अशा अभियांत्रिकी निगडित स्पर्धा होतील.

Web Title: Tantric Festival from KIT Saturday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.