शिरोळमध्ये ४४ गावांतील नळपाणी योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:24 AM2021-07-29T04:24:41+5:302021-07-29T04:24:41+5:30
संदीप बावचे लोकमत न्यूज नेटवर्क जयसिंगपूर : महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील सुमारे ४४ गावांतील नळपाणी पुरवठा योजना बंद आहेत. ज्या ...
संदीप बावचे
लोकमत न्यूज नेटवर्क
जयसिंगपूर : महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील सुमारे ४४ गावांतील नळपाणी पुरवठा योजना बंद आहेत. ज्या गावांमधील मार्ग सुरु आहेत, त्याठिकाणी शासनाकडून जवळपास १४ टॅंकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर सेवाभावी संस्था व नागरिकांनी वैयक्तिक पाण्याचे टँकर घेऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पुराच्या पाण्यामुळे नळपाणी योजना सुरु करण्यासाठी अडचणी येत असून, येत्या आठ दिवसात सर्व योजना पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
कृष्णेसह पंचगंगा, वारणा व दूधगंगा नद्यांच्या रुद्रावतारामुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसला. या महापुरामुळे जवळपास ४६हून अधिक गावांमधील नळपाणी पुरवठा योजनांचे जॅकवेल पाण्याखाली गेल्याने पाणी पुरवठा बंद पडला आहे. पाच ते सहा दिवस पुराचे पाणी प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे शिवाय वीज पुरवठाही बंद पडल्यामुळे पाणी योजना सुरु करण्यासाठी अडचणी आल्या आहेत. मोठे शहर असणाऱ्या जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड शहरांमध्येही पाणी-बाणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या गावांत वीज पुरवठा सुरु झाला आहे, त्याठिकाणी कुपनलिका, आरओ प्लांटच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या उदगावमधील पाणी पुरवठा सुरु झाला असून, उर्वरित ४१ गावे व तीन शहरांमधील नळपाणी योजना बंद आहेत. शासनाकडून १४ टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे. यासाठी शिरोळ-अर्जुनवाड रोडवरील टारे यांच्या विहिरीतून मोफत पाण्याची सोय करण्यात आली आहे. पूरग्रस्त छावणीमध्येही टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पुराचे पाणी संथगतीने ओसरत असल्याने नळपाणी योजना सुरु करण्यासाठी सध्यातरी अडचणी आहेत. मात्र, येत्या आठ दिवसात पाणी योजना पूर्ववत सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.