नळ योजना, रस्त्यांची कामे पालिका करणार

By admin | Published: May 25, 2016 01:10 AM2016-05-25T01:10:34+5:302016-05-25T01:11:53+5:30

इचलकरंजी सभेत प्रस्ताव मंजूर : आरोप-प्रत्यारोप, गदारोळ; दारू दुकानावरून नगराध्यक्षा-जाधव यांच्यात वाद

Taps, roads and roads | नळ योजना, रस्त्यांची कामे पालिका करणार

नळ योजना, रस्त्यांची कामे पालिका करणार

Next

इचलकरंजी : आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमक आणि त्यातून उडालेला गोंधळ यामुळे मंगळवारी झालेली नगरपालिकेची सर्वसाधारण सभा चांगलीच रंगली. अशा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलण्याचे २७ कोटी रुपये खर्चाचे काम आणि १५ कोटी रुपयांची रस्त्याची कामे जीवन प्राधिकरण व शासनाच्या बांधकाम खात्याऐवजी नगरपालिकेने करावीत, असा राष्ट्रीय कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसने दिलेला प्रस्ताव बहुमताने संमत करण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे होत्या.
नगराध्यक्ष बिरंजे यांनी ३२ विषयांवर मंगळवारी पालिकेची सभा आयोजित केली होती. सभेच्या सुरुवातीलाच सभागृहातील दोन्ही कॉँग्रेस व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी वेगवेगळे लक्ष्यवेधी प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे सुरुवातीलाच दीड तास सभेसमोरील विषयांवर कामकाज चालले नाही. लक्ष्यवेधी उपस्थित करताना गेल्या पंधरा सभांचे इतिवृत्त लिहिले गेलेले नाही, याबाबत नगरसेवक शशांक बावचकर यांनी विविध प्रश्न विचारले. तसेच नगररचनाकार प्रशांत राजे हे वारंवार गैरहजर राहत असल्याने पालिकेतील अनेक कामे अडून पडली आहेत. तरी त्यांची बदली करून त्यांच्याऐवजी इचलकरंजी पालिकेकडे सक्षम अधिकारी नेमावा, असाही प्रस्ताव यावेळी मंजूर करण्यात आला. नगरसेवक बाळासाहेब कलागते यांनी डेंग्यूमुळे गावभागातील चार नागरिक दगावल्याचा प्रश्न उपस्थित केला. यावेळी मात्र कॉँग्रेस व शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.
दरम्यान, शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी शिवाजीनगर परिसरातील दारू दुकान बंद करण्याचा प्रश्न उपस्थित केला. त्याला हा विषय सभेसमोर घेता येत नाही, असे म्हणून दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार विरोध केला, तर नगराध्यक्षांच्या विभागातील दुकान असल्याने याबाबत नगराध्यक्षांनी निवेदन करावे, असा आग्रह जाधव यांनी धरला. त्यावर बोलताना नगराध्यक्ष बिरंजे यांनी या दुकानाबाबत गेल्या कित्येक वर्षांत अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र, आंदोलनकर्त्या मोजक्याच महिलांकडून यामध्ये राजकारण केले जात आहे, अशी टीका नगराध्यक्षांनी केली. त्यावर अजित जाधव यांनी नगराध्यक्षांना तुमचा दारू दुकानाला पाठिंबा आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी दोन्ही कॉँग्रेसचे नगरसेवक रवी रजपुते, बाळासाहेब कलागते, अशोकराव जांभळे, शशांक बावचकर, आदींनी नगराध्यक्षांची पाठराखण केली आणि हा विषय आता चर्चेला घेता येणार नाही, असे ठामपणे सांगितले.
कृष्णा नळ पाणी योजनेकडील दाबनलिका बदलण्याच्या कामाविषयी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला आवश्यक असलेले एक कोटी ३५ लाख ९५ हजार रुपयांचे सेवा शुल्क वर्ग करण्याच्या विषयावर सभागृहातील दोन्ही काँग्रेसबरोबर ‘शविआ’च्या नगरसेवकांनी मतप्रदर्शन केले. या चर्चेत कलागते, रजपुते, बावचकर, रणजित जाधव, अजित जाधव, भाऊसाहेब आवळे, अशोकराव जांभळे, महादेव गौड, तानाजी पोवार, मदन झोरे यांनी जोरदारपणे विचार मांडले. यावेळी आरोप-प्रत्यारोप होत असताना राजकीय कलगीतुरा रंगला. अखेर कृष्णा नळ पाणी योजनेकडील दाबनलिका बदलण्याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाऐवजी नगरपालिकेने आणि शहरअंतर्गत पंधरा कोटींचे रस्ते शासनाच्या बांधकाम खात्याकडून करून घेण्याऐवजी नगरपालिकेने स्वत: करावेत, असा कॉँग्रेस व राष्ट्रवादीने दिलेला प्रस्ताव ३४ विरुद्ध ९ मतांनी मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)


व्हीपमुळे ‘त्यांचे’ मतदान प्रस्तावाला
डिजिटल फलक मुक्त शहर
शहरात विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या डिजिटल फलकांमुळे विद्रुपीकरण होत आहे. तरी नगरपालिका व शासकीय फलक यांच्याव्यतिरिक्त शहरात विविध ठिकाणी असलेले आणि रस्ता दुभाजकावर लावलेले सर्व फलक काढून टाकण्याचा महत्त्वपूर्ण ठराव या सभेत मंजूर झाला. त्यामुळे पालिकेला मात्र २२ लाख रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे.

Web Title: Taps, roads and roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.