ताराबाई पार्कात बंगला फोडला
By Admin | Published: February 14, 2016 12:54 AM2016-02-14T00:54:54+5:302016-02-14T00:54:54+5:30
सात लाखांचा ऐवज लंपास : नागरिकांमध्ये भीतीचे सावट
कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून शहरासह उपनगरात घरफोड्यांचा धुमाकूळ सुरू आहे. चोरट्यांनी रुईकर कॉलनी पाठोपाठ ताराबाई पार्क येथील बंद बंगला फोडून सोन्या-चांदीचे दागिने व किमती मोबाईल असा सुमारे सात लाख किमतीचा मुद्देमाल लंपास केल्याचे शुक्रवारी रात्री उघडकीस आले. चोरट्यांचे पोलिसांना आव्हान बनले असून, भीतीचे सावट पसरले आहे.
प्रकाश बळिराम शिंदे (वय ५८) यांचा ताराबाई पार्क, रेसिडेन्सी क्लबसमोर, यशोविद्या अपार्टमेंट शेजारी ‘प्रियाय’ हा बंगला आहे. ते आणि पत्नी साधना असे दोघेच राहतात. २३ जानेवारीला शिंदे दाम्पत्य व त्यांची मुलगी सौदामिनी असे तिघेजण मुंबई येथे राहणारी मोठी मुलगी प्रणाली हिच्याकडे राहण्यासाठी गेले होते. जाताना त्यांनी बंगल्याचे सर्व दरवाजे बंद केले होते.
शुक्रवारी रात्री ते कोल्हापुरात परतले. घरी आल्यानंतर त्यांनी दर्शनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता तो आतून बंद असल्याचे दिसले. त्यांना बंगल्याशेजारी असलेल्या इनोव्हा गाडीवर पायांचे ठसे दिसले. त्यामुळे जावई यश सोळंकी हे इनोव्हा गाडीवरून दूसऱ्या मजल्यावर गेले. येथील दरवाजाचा लोखंडी ग्रिलचा कोपरा वाकलेला दिसला. तसेच काचही फोडली होती. चोरीची शंका वाटल्याने त्यांनी दर्शनी दरवाजा जोरात ढकलून उघडला असता हॉलमधील दोन किमती मोबाईल गायब असल्याचे दिसले. तसेच बेडरूममधील कपाटातील साहित्यही विस्कटलेले होते. त्यामधील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने गायब असल्याचे दिसले. या प्रकारानंतर शिंदे यांनी शाहूपुरी पोलिसांना वर्दी दिली. पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनी लोखंडी दरवाजा, कपाटावरील चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले. रुईकर कॉलनीतील बंद बंगला फोडून चोरट्यांनी सात लाख किमतीचा ऐवज लंपास केला होता. या घरफोडीतील चोरट्यांनी हा बंगला फोडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दोन्ही बंगले एकाच रात्री फोडले आहेत.