पाठिंबा मागण्याचा हक्क ‘ताराराणी’ने अगोदरच गमावला
By admin | Published: November 7, 2015 12:13 AM2015-11-07T00:13:16+5:302015-11-07T00:15:42+5:30
जयंत पाटील यांचे प्रत्युत्तर : महापौर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच
कोल्हापूर : व्यक्तिगत जीवन असो की राजकारण, प्रत्येकाला कायमच दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागतो; परंतु राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करून ताराराणी आघाडीने पाठिंबा मागण्याचा हक्क गमावला असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रा. जयंत पाटील यांनी दिले आहे. तिन्ही अपक्षांनी आमच्या आघाडीला पाठिंबा दिला असून, कोणत्याही स्थितीत महापौर आमचाच होईल, असा दावा प्रा. पाटील यांनी केला.
पाटील म्हणाले, ‘पालकमंत्री चंद्रकांतदादा यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही बहुमताबाबत करीत असलेले दावे व आकडेमोड पाहून गंमत वाटत आहे. दोन्ही काँग्रेस निवडणुकीत विरोधात लढले; परंतु त्यांनी परस्परांवर कधीच टीका केली नाही. कारण निवडणुकीनंतर एकत्र यावे लागले तर पर्याय खुला असावा, अशी रणनीती त्यामागे होती. याउलट ताराराणी आघाडीचा मुख्य शत्रू हा राष्ट्रवादी काँग्रेसच होता. माजी महापौर सुनील कदम यांनी मुश्रीफ यांच्यावर टीका केली. या टीकेस आमदार महादेवराव महाडिक यांची संमती आहे का, याचा खुलासा करण्याची मुश्रीफ यांनी मागणी केली होती; परंतु महाडिक त्याबद्दल अजूनही काही बोलले नाहीत. असे असताना ताराराणी किंवा भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याचा प्रश्नच येत नाही. तो हक्क त्यांनी गमावला आहे.
भाजपचा महापौर केला नाही तर निधी देणार नाही, अशी भीती पालकमंत्री घालत आहेत का? अशी विचारणा करून प्रा. पाटील म्हणाले, ‘यापूर्वी शिवसेनेचे सरकार आले तेव्हा राज्यातील महापालिका बंद पडल्या होत्या का? सरकार राज्याच्या तिजोरीतून निधी देते. तो भाजपच्या फंडातून दिला जात नाही, याचीही आठवण पाटील यांनी करून दिली.