‘राष्ट्रवादी’च्या विरोधात ताराराणी आघाडीचे बंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:52 AM2018-04-27T00:52:42+5:302018-04-27T00:52:42+5:30

Tararani Alliance's Rebellion Against 'NCP' | ‘राष्ट्रवादी’च्या विरोधात ताराराणी आघाडीचे बंड

‘राष्ट्रवादी’च्या विरोधात ताराराणी आघाडीचे बंड

googlenewsNext


इचलकरंजी : नगरपालिकेकडील सत्तारूढ आघाडीमध्ये असलेले मतभेद गुरुवारी पुन्हा उघड झाले. ताराराणी आघाडीने राष्टÑवादी कॉँग्रेसच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात बंड करून गुरुवारच्या सभेवर बहिष्कार टाकला आणि सभेस गणपूर्ती झाली नसल्याने भाजपच्या नगराध्यक्षा अ‍ॅड. अलका स्वामी यांना सभा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
गुरुवारी होणाऱ्या नगरपालिकेतील सभेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. २५) सत्तारूढ आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये बांधकामाच्या कामावरून मतभेद झाले होते. अखेर वाद होऊन बुधवारची बैठक संपली.
बुधवारच्याच विषयावर गुरुवारी सकाळी सभेपूर्वी साडेअकरा वाजता ताराराणी आघाडीच्या नगरसेवक-नगरसेविकांची बैठक उपनगराध्यक्षा सरीता आवळे यांच्या दालनात सुरू झाली. आघाडीचे प्रमुख चाळके यांचा भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय झाला. त्यानंतर सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्षा स्वामी यांच्या दालनात भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार, राष्टÑवादीचे अशोकराव जांभळे, नगरसेवक युवराज माळी, दिलीप मुथा, आदींची बैठक झाली. यावेळी चाळके यांना बोलावून घेतले. बैठकीत जांभळे व चाळके यांच्यात पुन्हा मतभेद झाले. आमदार सुरेशराव हाळवणकर यांचा सत्तारूढ आघाडीची समन्वयाची बैठक शुक्रवारी घेण्याचा दूरध्वनीवरून निरोप आला. सभागृहात गणपूर्ती नसल्याचा मुद्दा कॉँग्रेसचे नगरसेवक राहुल खंजिरे यांनी उपस्थित केला. त्यावेळी सभागृहात ६७ नगरसेवकांपैकी १४ नगरसेवक उपस्थित होते. त्यामुळे अखेर सभागृहात गणपूर्ती नसल्याने सभा रद्द करण्याचा निर्णय नगराध्यक्षांना घ्यावा लागला.
सभेस उपस्थित राहणे
जबाबदारी : नगराध्यक्षा
शहरातील विविध विकासकामे आणि नागरी सेवा-सुविधा मार्गी लावाव्यात, यासाठी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा बोलविण्याची जबाबदारी नगराध्यक्षांची आहे. तशी सभेला उपस्थित राहण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे, अशी माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली.नगरपालिकेत विरोधी असलेल्या आघाडीच्या प्रमुखांना काही धोरणात्मक कामासंदर्भात विश्वासात घेऊनच कामकाज चालविण्यात येते, असेही नगराध्यक्षा स्वामी म्हणाल्या. ‘ताराराणी’चे प्रमुख सागर चाळके यांचा गैरसमज झाला होता. त्यातून गुरुवारच्या घडामोडी घडल्या; पण आज, शुक्रवारी आमदार सुरेश हाळवणकर समन्वयाची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर आपोआपच सर्व काही सुरळीत चालेल, असा विश्वास अजित जाधव व तानाजी पोवार यांनी व्यक्त केला.
आमदार, नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा
सभा रद्द झाल्याने सत्तारूढ व विरोधी आघाडीत कलगीतुरा रंगला. कॉँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी सभेसाठी गणपूर्ती करण्याची जबाबदारी नगराध्यक्षांची असताना त्यांच्या भाजपचेच नगरसेवक अनुपस्थित राहिल्याबद्दल नगराध्यक्षा स्वामी यांना दोष दिला. तसेच दीड वर्षापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी जाहीरनाम्यात दिलेले एकही काम मार्गी लागले नसल्याने त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तर नगराध्यक्षांनी विश्वास गमावल्याने त्यांनीही राजीनामा द्यावा, अशी मागणी राजर्षी शाहू आघाडीचे पक्षप्रतोद विठ्ठल चोपडे यांनी केली.
सर्व सभापतींना कामाची संधी : चाळके
बुधवार व गुरुवार असे दोन्ही दिवस चर्चेच्या केंद्रस्थानी असलेले ‘ताराराणी’चे पक्षप्रतोद सागर चाळके यांनी आमच्यातील मतभेद हे घरातील (आघाडीअंतर्गत) असल्याचे सांगितले व ते म्हणाले, महिला व बालकल्याण, इस्टेट, शिक्षण, आरोग्य अशा विविध समित्यांच्या सभापतींना विधायक काम करण्याची संधी मिळाली पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये, अशी आमची भूमिका आहे.
विरोधकांना विकासाची पर्वा नाही
तानाजी पोवार व अजित जाधव म्हणाले, गुरुवारच्या सभेत शहराच्या विकासाचे विषय असतानाही कॉँग्रेस व शाहू आघाडीचे नगरसेवक गैरहजर राहिल्याने सभा रद्द करावी लागली.

Web Title: Tararani Alliance's Rebellion Against 'NCP'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.